दहावी-बारावी अनुत्तीर्ण : ईच्छाशक्तीचा अभाव, केवळ पाच हजार विद्यार्थी देणार फेरपरीक्षालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेत काही कारणास्तव अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेरपरीक्षा घेतली जात आहे. मात्र, यंदा अनुत्तीर्ण झालेल्या १४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार विद्यार्थीच फेरपरीक्षेला बसणार आहेत. त्यामुळे फेरपरीक्षेबाबत शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच पोहोचविली की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.येत्या ११ ते २८ जुलै या कालावधीत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता बारावीची फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ९ शाळांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. लेखी परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांची सध्या १ ते १० जुलैदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य दिसते. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ३३ हजार ४१५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ५ हजार ७९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून वर्ष वाचविण्याची उत्तम संधी असतानाही केवळ २ हजार १३६ विद्यार्थीच बारावीच्या फेरपरीक्षेला बसले आहेत. तर ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.मार्चमध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात साडेनऊ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यासाठी आता १८ जुलै ते २ आॅगस्टपर्यंत फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यात १५ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. तर १० ते १७ जुलैदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होत आहे. परंतु, जिल्ह्यातील साडेनऊ हजार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ हजार ७२६ विद्यार्थीच फेरपरीक्षेला बसणार आहेत. उर्वरित साडेपाच हजार विद्यार्थी परीक्षेला का बसले नाही, याचे उत्तर शिक्षण विभागाकडेही नाही. विशेष म्हणजे, फेरपरीक्षेला पात्र असलेला कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, याबाबत दक्षता घेण्याची सूचना अमरावती विभागीय मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी केली होती.अशी आहेत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रेदहावी : यवतमाळ लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नेर शिवाजी विद्यालय, दारव्हा शिवाजी विद्यालय, आर्णी भारती विद्यालय, पुसद नाईक कॉन्व्हेंट, उमरखेड साकळे विद्यालय, जिल्हा परिषद कन्या हायस्कूल, महागाव जिल्हा परिषद हायस्कूल, कळंब शिवशक्ती महाविद्यालय, पांढरकवडा जिल्हा परिषद हायस्कूल, वणी जनता विद्यालय, घाटंजी समर्थ शाळा, राळेगाव न्यू इंग्लिश हायस्कूल, मारेगाव राष्ट्रीय विद्यालय.बारावी : यवतमाळ अँग्लो हिंदी विद्यालय, दारव्हा मुंगसाजी महाविद्यालय, पुसद के.डी. जाधव विद्यालय, लोकहीत विद्यालय, कळंब चिंतामणी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, पांढरकवडा केईएस महाविद्यालय, वणी लोकमान्य टिळक महाविद्यालय.
नऊ हजार विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेकडे पाठ
By admin | Published: July 10, 2017 1:01 AM