वणी : तालुक्यातील रांगणा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकडे पंचायत समिती, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरविली. त्यामुळे संतप्त झालेल्या रांगणावासीयांनी थेट पंचायत समिती गाठून रोष व्यक्त केला. या महोत्सवासाठी ग्रामस्थांनी तब्बल १ लाख ३५ हजार रूपये गोळा केले होते, हे विशेष.२० ते २३ जानेवारीदरम्यान रांगणा येथील जिल्हा परिषद शाळेत वणी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात येत आहे. बुधवारी २० जानेवारीला या महोत्सवाचे मोठ्या थाटात पंचायत समिती सभापती सुधाकर गोरे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मिलिंद पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शरद ठाकरे, वृशाली खानझोडे, दयालाल अर्के, सरपंच दिलीप परचाके, सविता वांढरे, मारोती तेलंग, महादेव कातकर व शाळा समिती सदस्य उपस्थित होते. उद्घाटनानंतर गुरूवारपासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होणार होत्या. मात्र गुरूवारी कोणत्याही शाळेचा संघ रांगणा येथे पोहोचलाच नाही. ग्रामस्थांनी संघ शुक्रवारी येतील, म्हणून वाट बघितली. मात्र शुक्रवारीही संघ दाखल झालेच नाही.गेल्या महिन्यात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आले. त्यात विजयी झालेले संघ या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात सहभागी होणार होते. त्यासाठी रांगणा येथील शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तब्बल १ लाख ३५ हजार रूपये गोळा केले होते. या चार दिवसांची शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी धान्य आणून ठेवले होते. आपल्या गावात तालुकास्तरीय स्पर्धा होणार असल्याचा आनंद त्यांना झाला होता. मात्र या महोत्सवात संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी विजयी संघ आणलाच नाही. त्यामुळे हा सर्व खर्च व्यर्थ गेला. या महोत्सवासाठी गावातील चिमुकले व महिलांनी ग्रामसफाई तसेच शाळा परिसर सुशोभीत केला होता. त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. गावात एकही संघ न पोहोचल्यामुळे ग्रामस्थ निराश झाले. त्यांचा संताप अनावर झाला. शेवटी शुक्रवारी दुपारी सरपंच दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ, शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीवर धडक दिली. त्यावेळी गटविकास अधिकारी त्यांच्या कक्षात नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांचा पारा पुन्हा भडकला. जोपर्यंत बिडीओ येणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य मिलींद पाटील व शरद ठाकरे यांनीही याबाबत प्रचंड चिड व्यक्त करीत संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांविरूद्ध कारवाईची मागणी केली. शेवटी तेथे गटशिक्षणाधिकारी वामन मेश्राम यांना बोलाविण्यात आले. सरपंच परचाके व ग्रामस्थांनी हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सरपंच परचाके यांना लेखी पत्र दिले. त्यात ज्या शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख तेथे पोहोचले नाही, त्यांच्याविरूद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे नमूद केले. त्यानंतर रोष कमी झाला. (कार्यालय प्रतिनिधी)
क्रीडा महोत्सवाकडे सर्वांची पाठ
By admin | Published: January 23, 2016 2:36 AM