- अविनाश साबापुरेयवतमाळ : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा गुरुवारी साजरा होतोय. खेडे सोडून शहरात स्थिरावलेले शेतकरीपुत्रही गोडधोड खाऊन पोळा ‘एन्जॉय’ करतातच; पण बेड्डी, जुपणं, शिवळ, कसाटी, मुस्के, टापर म्हणजे काय? बैलांच्या साजशृंगारात कोणत्या वस्तू असतात? हे प्रश्न नव्या पिढीला कधीच पडत नाहीत. पडले तरी नीट उत्तर मिळत नाही. हा ‘गॅप’ भरून काढण्यासाठी वाटखेड (ता. बाभूळगाव) येथील उच्चशिक्षित शेतकरी राजेश हनुमंतराव अंगाईतकर यांनी कृषी जीवनातील प्रत्येक साहित्याचे सुबक काष्ठशिल्प तयार केले आहे. त्यांच्या प्रदर्शनाची धडपड त्यांनी सुरू केली आहे.
बैलाची सजावट पोळ्याला बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या झूल, गेरू, बेगड, बाशिंग, मटाट्या, घुंगरू अशा साहित्यांची नव्या पिढीला माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
पेरणी ते पीक काढणीअंगाईतकर यांनी नांगर, वखर, तिफण, डवरा, सरते, रुमणे, जोखड, टापर, टाळ, बेड्डी, ताटी, मथाटी, काडवन, खांजाय, तिपाई, मुस्के, रासोंड्याचा डेक, माळोशी, मचाण, सराटा, कुदळ, कुऱ्हाड, विळा, फावडे, घुंगरू या सर्व वस्तू हुबेहूब साकारल्या आहेत.
शेतीतील लाकडी अवजारांचे महत्त्व आजही कायम आहे; पण लोक खाचरापासून वखरापर्यंत प्रत्येक वस्तू लोखंडी विकत घेत आहेत. बैल पोसायलाही कुणी तयार नाही. - राजेश अंगाईतकर, शेतकरी, कलावंत