लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकारने जाहीर केलेली शिक्षक भरतीची आॅनलाईन प्रक्रिया रद्द करून आम्हालाच शिक्षक भरती करू द्या, अशी मागणी करत शिक्षण संस्थाचालकांनी शुक्रवारी शाळाबंद आंदोलन केले. जिल्ह्यातील शाळांनी बंदमध्ये सहभागी होत शंभर टक्के प्रतिसाद दिला.पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी शासनाने प्रयत्न सुरू केले असले तरी, त्यात शिक्षक नेमण्याचे संस्थाचालकांचे अधिकार कमी करण्यात आले आहे. २०१२ पासून भरतीवर बंदी असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. एकीकडे पवित्रची प्रक्रिया सुरू असल्याचे दाखवायचे मात्र दुसरीकडे शिक्षक भरतीला वेळ लावायचा, असा प्रकार शासन करीत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टल मागे घेऊन शिक्षण संस्थांचे अधिकार कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने एक दिवसीय शाळाबंद आंदोलन पुकारले.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळता सर्वच शाळा शुक्रवारी दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. यात अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळाही बंद ठेवण्यात आल्या. संस्थाचालकांच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. शाळांना न्यायालयाच्या निर्णयानुसार १२ टक्के वेतनेतर अनुदान लागू करा, नागपूर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी नियुक्त केलेल्या शिक्षकांना मान्यता द्यावी, त्यांचे वेतन अदा करावे, शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही जागा भरण्याची परवानगी द्यावी, शाळा इमारतीवरील कर माफ करावा, वीज बिलात शाळांना सवलत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष दिवाकर पांडे, सचिव सुहास देशमुख, अर्चना धर्मे आदींचा समावेश होता.
शिक्षक भरती आम्हालाच करू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 8:56 PM
सरकारने जाहीर केलेली शिक्षक भरतीची आॅनलाईन प्रक्रिया रद्द करून आम्हालाच शिक्षक भरती करू द्या, अशी मागणी करत शिक्षण संस्थाचालकांनी शुक्रवारी शाळाबंद आंदोलन केले. जिल्ह्यातील शाळांनी बंदमध्ये सहभागी होत शंभर टक्के प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देसंस्थाचालकांचा आग्रह : शाळाबंद आंदोलनाला जिल्ह्यात प्रतिसाद