नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये शहरातील रस्ते, नाली, पाणी, शौचालय व घरकुलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन हे प्रश्न मार्गी लावले. वाढीव पाणीपुरवठा, कचरा डेपो, रस्ते व नाली बांधकामाचे प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित आहेत. सध्या कार्यकाळ संपलेला आहे. नव्याने नगरपंचायतीमध्ये येऊन प्रलंबित कामे मार्गी लावू.
-रेखा मडावी, माजी नगराध्यक्ष, मारेगाव
या समस्यांकडे लक्ष द्यावे लागणार
शहरातील वाढते अतिक्रमण ही जनतेसाठी आता डोकेदुखी ठरली आहे. शासकीय मोकळी जागा, रस्ते यावर सर्रास अतिक्रमणे केली जात आहेत. या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमणाने शहरात उग्र रूप धारण केले आहे. अनेक रस्ते व शासकीय जागा अतिक्रमणधारकांच्या घशात जात आहेत. पक्की बांधकामे केली जात आहेत. नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.
आजही शहरातील अनेक भागांत नाली व रस्ते बांधली गेली नाही. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वाॅर्डात शुद्ध पाणी मिळत नाही. नियमित सफाई होत नाही. आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. या समस्यांकडे नगरपंचायत लक्ष देतील, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.