अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याला नव्या नाहीत. पण परवा एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. तीन दिवस या शेतकऱ्याचा मृतदेह ताटकळत राहिल्यावरही सरकारकडून दखल घेतली गेली नाही. अखेर मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले. तिच्या पाठोपाठ आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येत राष्ट्रपतींना एक लाख पत्र पाठविण्याची मोहीमच उघडली आहे.देशाला लोकशाही देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावात ही मोहीम सुरू करण्यात आली.राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या करताना ‘माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील’ अशी चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यावरून त्यांची मुलगी जयश्री चायरे हिने घाटंजी पोलीस ठाण्यात नरेंद्र मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रारही नोंदविली आहे. तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने गुन्हा दाखल होईपर्यंत आणि कुटुंबीयांना एक कोटीची मदत होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र तीन दिवस ताटकळत राहिल्यावरही सरकारने दखल घेतली नाही. अखेर माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना राजी केले.परंतु, अद्यापही न्याय न भेटल्याने शंकर चायरे यांची बीएससी करत असलेली मुलगी जयश्री हिने थेट पंतप्रधानांच्या निषेधाचे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस तिने निवडला. शनिवारी राजूरवाडी गावातीलच छोट्याशा पत्रपेटीत तिने राष्ट्रपतींच्या नावे पोस्टकार्ड टाकले.माझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार आहेत, असे लिहितानाच जयश्रीने या पत्रात वडीलांच्या दैनावस्थेची कहाणी मांडली आहे. चायरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अख्खे राजूरवाडी गाव यावेळी तिच्यासोबत उपस्थित होते.तसेच शेतकरी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार उपस्थित होते. जयश्रीनंतर लगेच एका रांगेत येऊन प्रत्येक गावकऱ्यानेही राष्ट्रपतींना पत्र पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध पवित्रा घेणे आणि त्यासाठी चक्क राष्ट्रपतींना साकडे घालणे, या प्रकारामुळे सध्या जिल्ह्याचे राजकीय वर्तृळ ढवळून निघाले आहे.
महिनाभर चालणार पत्रमोहीमपंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देत यवतमाळचा दौरा ऐनवेळी रद्द केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याही निषेधाचे एक लाख पत्र राज्यपालांना पाठविण्यात येत आहे. ही मोहीम आम्ही १४ एप्रिल ते १४ मे अशी महिनाभर राबविणार आहोत. रोज शेकडो पत्र मिळाल्यावर तरी व्यवस्थेला शेतकऱ्यांची परिस्थिती कळेल, अशी आशा जयश्री शंकर चायरे आणि शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केली.