यवतमाळ : यवतमाळ पंचायत समिती कार्यालयावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचा विशेष वॉच आहे. आतापर्यंत त्यांनी तीन ते चारवेळा पंचायत समितीला अकस्मात भेट देवून लेटलतिफ कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची तंबी दिली होती. मात्र वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता सीईओंनी भेट दिली. यात १७ कर्मचारी गैरहजर होते. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक वेतनवाढ रोखण्याचे निर्देश साईओंनी दिले आहेत. सीईओंनी अकस्मातरीत्या पंचायत समितीला सकाळी पहिल्या तासातच भेट दिली. यात धक्कादायक वास्तव समोर आले. विविध विभागातील १७ कर्मचारी गैरहजर होते. वारंवार सांगूनही वेळेत कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. शिवाय एक दिवसाचा पगारही कापण्यात येणार आहे. सलग तीनवेळा असा प्रकार घडल्यामुळे सूचना देवूनही पालन न केल्याने या कर्मचाऱ्यांची थेट वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय सीईओंनी घेतला आहे. या कडक कारवाईमुळे पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे. निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नसल्याचे यावरून दिसून येते. कठोर कारवाईनेच हे कर्मचारी वठणीवर येणार असतील तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. कामकाजाचा गाडा रूळावर आणण्यासाठी कार्यालयीन शिस्त महत्त्वाची असल्याने स्वत: सीईओ लक्ष ठेवून आहे. याचे काय सकारात्मक परिणाम होतात हे लवकरच दिसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
लेटलतिफ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार
By admin | Published: July 18, 2014 12:21 AM