नेर : लेटलतिफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे नेर पंचायत समितीवर अवकळा आली आहे. यात मात्र ग्रामीण भागातील नागरिक भरडला जात आहे. शिवाय दलालांची मनमानी वाढली आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनीही या कार्यालयाचा वापर आपल्या जनसंपर्क कार्यालयासारखा सुरू केला आहे. कार्यालयाच्या खुर्चीत बसलेला व्यक्ती अधिकारीच असेल हे ठामपणे सांगता येत नाही. तालुक्यात ५४ ग्रामपंचायती आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम, बालविकास प्रकल्प कार्यालय, आरोग्य आदी विभागात दररोज शेकडो नागरिक मजूरी पाडून या कार्यालयात येतात. मात्र त्यांना दुपारी १२ वाजतापर्यंतही बहुतांश अधिकारी वा कर्मचारी उपलब्ध होत नाही. काही कर्मचारी आणि अधिकारी यवतमाळहून तर काही अमरावतीवरून ये-जा करतात. एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही तर ते कार्यालयातून केव्हाही निघून जातात. या सर्व प्रकाराचा परिणाम पंचायत समितीच्या कामकाजावर होत आहे. पाणीटंचाई, रस्ते, घरकुल आदी योजना प्रलंबित आहेत. काही कामे वादग्रस्त असल्याने थांबली आहेत. या पंचायत समितीचा बांधकाम विभाग दलाल आणि कंत्राटदारांनी भरलेला असतो. सामान्य नागरिकांना याठिकाणी अधिकारी कधी वेळ देत असेल हा प्रश्नच आहे. आरोग्य विभाग तर गप्पा मारण्याचे स्थान बनले आहे. याशिवाय या पंचायत समितीच्या इतर विभागातही सावळा गोंधळ सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
लेटलतिफ कर्मचाऱ्यांमुळे पंचायत समितीवर अवकळा
By admin | Published: February 27, 2015 1:30 AM