शासनाचा निर्णय : शेतकरी कुटुंबीयांच्या फायद्याची योजना, सात-बाराच्या उताऱ्यावरही मिळेल योजनेचा लाभयवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्यात ३१ मे २०११ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यास सुरवात करण्यात आली. सुरवातीला या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आता यामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयासह अमरावती विभागातील चार, औंरगाबाद विभागातील आठ जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध नसल्यास सात-बाराच्या उताऱ्यावर सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी कुटुंबांचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहणार असून शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच जिल्हयातील सर्वच शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा अतिरीक्त विमाहप्ता विमा कंपनीस अदा करण्यात येईल, ज्या शेतकरी कुटुंबांकडे शुभ्र शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांना सात-बाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचे नाव शुभ्र शिधापत्रिका व सात-बारा उताऱ्यात समाविष्ट नसल्यास हा सदस्य त्या कुटुंबातीलच असल्याबाबतचे संबंधीत महसुली अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायीचा लाभ
By admin | Published: May 25, 2016 12:16 AM