तीन साक्षीदार फितूर : पाच आरोपी निर्दोष, दोघे अद्यापही फरार यवतमाळ : येथील पाटीपुरा परिसरातील महात्मा फुले चौकात २० मे २०१४ रोजी जुन्या वादातून सात-आठ जणांनी मिळून अजय भीमराव बन्सोड (२३) या युवकाचा चाकुने हल्ला करून खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी रितेश उर्फ बल्ली विलास बाविस्कर (२२) रा. अशोकनगर पाटीपुरा याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविली तर इतर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी मृतक अजय बन्सोडची पत्नी ज्योती अजय बन्सोड रा. कपिलवस्तू नगर हिने शहर पोलिसात तक्रार दिली होती. अजय बन्सोेड याची दुचाकी अडवून वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला करून ठार करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रितेश उर्फ बल्ली विलास बाविस्कर (२२) रा. अशोकनगर, पाटीपुरा, सचिन सुरेश डोंगरे (२६), अनिकेत दिनेश वासनिक (२१), राजेश राहुल जंगले (२६), विरेन्द्र उर्फ विऱ्या अशोक कोल्हे (२५) व विजय भीमराव धुळे (२८) रा. सर्व पाटीपुरा यवतमाळ यांना अटक केली होती. या प्रकरणातीलच नितीन भीमराव धुळे (२५) व अनिल भीमराव गजभिये (३२) हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सदर प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर सहा जणांविरुद्ध खटला चालविण्यात आला. एकूण १४ साक्षिदार तपासले. उल्लेखनिय म्हणजे यातील मुख्य तीन प्रत्यक्षदर्शी साक्षिदार फितूर झाले. तरीसुद्धा मृतकची पत्नी ज्योती हिचे बयान, वैद्यकीय अहवाल व प्रत्यक्षदर्शी पुरावा आदींना ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव यांनी रितेश बाविस्कर याला जन्मेठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास ठोठाविला. इतर पाच आरोपींची मात्र सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र बी. मेश्राम यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी) मुलगा व पत्नीला पाच लाख मिळणार मृतक अजय बन्सोडची पत्नी ज्योती व मुलगा यांच्या उदरनिर्वाहाचा सध्या मोठा प्रश्न आहे. हे दोघेही उघड्यावर आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तजविज असावी, ही बाब अॅड. नरेंद्र मेश्राम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने मृतकाची पत्नी ज्योती हिला तीन लाख रुपये व मुलाला दोन लाख रुपये मंजूर केले. ही बाब या खटल्यातील वैशिष्ट ठरले.
अजय बन्सोड खूनप्रकरणी ‘बल्ली’ला जन्मठेपेची शिक्षा
By admin | Published: August 04, 2016 12:54 AM