यवतमाळ : ज्याच्याशी प्रेमविवाह केला, तो पतीच दारूच्या आहारी जाऊन दररोज शारीरिक व मानसिक छळ करू लागला. अखेर या छळाला कंटाळून या पतीचा पत्नीनेच खून केला. यवतमाळच्या लोहारा स्थित शिवाजीनगरात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या खून खटल्यात बुधवारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश के.आर. पेठकर यांनी आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिल्पा प्रदीप घरत (२५) असे या शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. शिल्पा व प्रदीप यांचा प्रेमविवाह आहे. त्यांना एक मुलगी आहे. लग्नानंतर प्रदीपला दारूचे व्यसन लागले. तो दारूच्या पूर्णत: आहारी गेला. नशेत तो पत्नी शिल्पाला प्रचंड मारहाण करायचा. अखेर रोजच होणा-या या छळाला कंटाळून अखेर शिल्पाने जणू हा त्रास कायमचा थांबविण्याचा निर्णय घेतला. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रदीपने पुन्हा शिल्पासोबत वाद घातला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. त्यातूनच शिल्पाने सिमेंटची वीट प्रदीपच्या डोक्यात घातली. त्यामुळे तो जागीच कोसळला. तिनेच रक्तबंबाळ अवस्थेतील प्रदीपला ओढत घराबाहेर आणले.हे पाहून शेजारी गोळा झाले. त्यांनी गंभीर जखमी प्रदीपला उपचारार्थ दाखल केले. मात्र नागपूर येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रदीपची आत्या कुसूम गंगाधर कोठेकर यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार संजय डहाके यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रदीप घरतच्या खुनाचा खटला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. पेठकर यांच्यापुढे चालला. न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यातील एक पंच न्यायालयात फितूर झाला. मात्र फिर्यादी कुसुम व डॉक्टरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. पेठकर यांनी मृताची पत्नी शिल्पा घरत हिला बुधवारी जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता नीती दवे यांनी मांडली.
दारूड्या पतीला संपविणा-या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 6:09 PM