संकटकाळात मदतीला धावून जाणाऱ्यांचे कौतुक
Date: 1 Jun 2021
दारव्हा : तालुक्यातील एका महिला तलाठ्याने धावपळ करून गंभीर जखमी अवस्थेतील एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. समाजभान हरविलेल्या या कोरोनाच्या काळात हिंमत दाखविणारी तलाठी व या कामी मदत करणाऱ्या इतरांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील हातगाव येथील तलाठी प्रियंका येईलवाड आपल्या पतीसह सोमवारला कार्यालयात जाण्याकरिता दारव्ह्याकडे येत होत्या. त्यावेळी त्यांना यवतमाळ नजीकच्या घाटात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत उन्हात विव्हळत पडलेला दिसला. त्यांनी थांबून त्याला आगोदर सावलीत नेले. त्यानंतर १०८ नंबरवर ॲम्बुलन्ससाठी फोन केला. तेव्हा गाडी पाठवितो असे उत्तर मिळाले. पण क्षणाक्षणाला त्याची अवस्था बिघडत चालली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्याला घेऊन कसे जावे हा मोठा प्रश्न होता. यासाठी त्यांनी रस्त्यावरून जाणारी चारचाकी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. खूप जणांना हात दाखविले. परिस्थिती समजावून सांगितली. परंतु प्रयत्न करूनही कुणी थांबण्यास तयार नव्हते. तेवढ्यात रसिका मोगरे व त्यांचा भाऊ सागर मोगरे त्यांच्या मदतीला थांबले. सर्वांनी मिळून वाहन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर प्रयत्नांना यश आले. दारव्हा येथील अर्जुन जाधव नावाचे शिक्षक या मार्गाने जात असताना त्यांना हात दाखवून थांबविले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमीला आपल्या गाडीतून रुग्णालयात नेण्याची तयारी दर्शविली. सर्वांनी मिळून जखमीला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. परिस्थिती एवढी गंभीर बनली की संकटाच्या काळातही कुणी कुणाला मदत करायला तयार होत नाही. परंतु सोमवारच्या या घटनेनंतर मात्र माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आला. जीवाची पर्वा न करता अर्जुन जाधव, तलाठी प्रियंका येईलवाड, त्यांचे पती प्रवीण चिलकुलवार, रसिका मोगरे व सागर मोगरे यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविले. त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला.