प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सर्वत्र लॉकडाउन, त्यात रखरखते ऊन, रस्त्याने ना खाण्याची ना पिण्याच्या पाण्याची सोय. खिशात दमडी नाही. माय-बापाच्या कडेवर चिमुकली लेकरं, डोक्यावर प्रपंचाच ओझं, जागोजागी चौकशीचा त्रास, पायी चालून चालून क्षीण झालेले शरीर. कुठे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची छाया, कधी ट्रकमधून लपूनछपून प्रवास. कधी पायी, मिळेल त्या वाहनात बसून आपल्या गावी जाण्याची आस असलेल्या मजुरांचा हजारो मैलांचा जीवघेणा प्रवास अद्याप थांबलेला नाही.हैद्राबादवरून मधप्रदेश, उत्तरप्रदेशकडे आपल्या गावी, मातृभूमीकडे निघालेल्या स्थलांतरीत मजुरांचे पांढरकवडा तालुक्यातून जाणारे असाह्य मजुरांचे लोेंढे व त्यांच्या यातना पाहून सारेच गलबलून जात आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाउनमुळे अनेक मजूर अडकून पडलेत. शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला. सुरूवातीला काही सामाजिक संस्थांनी, काही गावातील नागरिकांनी जेवण व पाण्याची सोय केली. परंतु मजुरांचे लोंढेच सुरू झाल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या. प्रशासनच्यावतीने मजुरांचे स्तलांतर थांबविण्यासाठी काही ठिकाणी त्याची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. दरम्यान, मजुरांचे पायी चालत जाणे सुरूच राहिले. ३०० ते ४०० मजुरांचे जथ्थे पायी चालत हैदराबाद येथून निघून पांढरकवडात पोहचले. कुणी पायी चालत होते, तर कुणी मिळेल त्या झाडाच्या सावलीत थांबून विसावा घेत आहेत. यातील अनेकजण उपाशीपोटी होते. काहींना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हते. काही वेळ थांबून बैतुल मधप्रदेशकडे ते रवाना झाले होते. असे मजूर दररोज पायीच चालत असताना दिसत आहेत. राज्या-राज्यात प्रवेशबंदी आहे. तरी या मजुरांना रोखणे अशक्यप्राय झाले आहे. हजारो मजूर एकत्र निघाले असताना कोरोना संसर्गाची भीती आहे. तरीसुद्धा मरू पण आपल्या गावी जाऊन मरू, असे म्हणत या मजुरांनी आपल्या गावी जाण्याची आस सोडली नाही. आता मजुरांना जाण्याबाबत काही नियम शिथिल झाले आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय शिबीर सुरू आहे. त्या ठिकाणाहून मजुरांना वाहनांची व्यवस्था करण्यात येत असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
असाह्य मजुरांचा जीवघेणा प्रवास थांबता थांबेना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM
शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला.
ठळक मुद्देस्वगृही जाण्याची आस : रखरखत्या उन्हात हजारो मैल पायी प्रवास, हालअपेष्टांनी मजूर जेरीस, मदतही मिळेना