लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : या भागातील खासदार, आमदारांनी केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत मतदानाद्वारे गद्दाराला धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
दारव्हा येथील माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे, खासदार संजय देशमुख, कॉग्रेसचे पक्ष निरीक्षक खा. रवी मल्लू, आमदार मिलिंद नार्वेकर, मेघा रेड्डी, माजी आमदार संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, बाळासाहेब मांगुळकर, जितेंद्र मोघे, मनीष पाटील, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, पी.बी. आडे, पवन जयस्वाल, प्रवीण शिंदे, संजय मोघे, संतोष ढवळे, वर्षा निकम, जितेश राठोड, शरद माहूरे, बाबूपाटील जैत, नितीन माकोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच संजय राठोड यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली, समाजाचा दुरुपयोग करून आपल्या तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे, मुंबईत सेवालाल महाराज संस्थेसाठी शासनाने दिलेली जमीन हडपली. ही बंजारा समाजाशी बेईमानी आहे. आपले सरकार येताच, पहिले या प्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा त्यांनी दिला. मधल्या काळात यांच्यावर आरोप झाले तेव्हा, मांडीला मांडी लावून बसण्याची लाज वाटत होती, तेव्हा मिंधेच याला वाचवायला मागे लागले होते, परंतु आपण मंत्रिमंडळाबाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांवर हल्ला चढविला. इकडे येऊन वाकडे तिकडे आव्हान देऊ नका, अशा शब्दांत ठणकावले. या सरकारच्या काळात कोणताही घटक खूश नाही, परंतु आपले सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, महिलांना महिन्याला तीन हजार रुपये, मुलांना मोफत शिक्षण, गुजरातला पळविलेले उद्योग परत आणून बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन कैलास राऊत, तर आभार सय्यद फारुख यांनी मानले.
खासदार देशमुख यांनी मांडल्या स्थानिक समस्या खासदार संजय देशमुख यांनी मार्गदर्शन करताना मतदारसंघातील दिग्रस राष्ट्रीय मार्ग, पाणीपुरवठा योजना, सिंचन व इतर स्थानिक समस्यांचा पाढा वाचला, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या जुन्या भाषणाची टेप वाजवून दाखवीत असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याचे सत्ताधारी महागाई, बेरोजगारी आणि शेतमालाच्या भावासाठी कसे ओरडत होते आणि आता मात्र शेतमालाला भाव नाही तर त्यावर कशी चुप्पी साधली आहे हे सांगितले. यावेळी देशमुख यांनी संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयल केले जातील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
पवन जयस्वाल यांना वाऱ्यावर सोडणार नाही भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी जवळ बोलावून पवन जयस्वाल यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले, यांना उमेदवारी दिली होती, परंतु माघार घ्यायला सांगताच त्यांनी कोणतेच आढेवेढे न घेता पक्षादेश मानला. याला म्हणतात निष्ठा. आता जयस्वाल आणि माणिकराव ठाकरे यांची जबाबदारी मतदारांवर असल्याचे ते म्हणाले.
हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगेची तपासणी प्रचारसभेला आल्यानंतर दारव्हा येथे हेलिकॉप्टरमधून उतरताच आपल्या बॅगेची निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाषणात याबाबत संताप व्यक्त केला. आपल्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासता का, असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केला. लोकसभा निवडणुकीवेळी बॅगा भरभरून पैसा नेण्यात आला. तसेच यावेळीसुद्धा अनेक ठिकाणी पैसे पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा कायदा सर्वांसाठी सारखा ठेवा, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचीसुद्धा तपासणी करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली.
मान खाली घालावी लागेल असे काम केले नाही - माणिकराव आपल्या जनतेच्या पाठिंब्याने राष्ट्रीय, राज्य पातळीवर काम करण्याची मला संधी मिळाली, परंतु कधीही भ्रष्टाचार, गैरव्य वहार केला नाही. जनतेला मान खाली घालावी लागेल असे कृत्य केले नसल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वीस वर्षांच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसेच पुन्हा काम करण्यासाठी संधी देण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण आहे. सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठीची योजना आघाडीने आखली असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आजची गर्दी पाहता आपला विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.