अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या धोरणाची आता महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली असून, पूर्वप्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंगणवाड्या प्राथमिक शाळांसोबत ‘लिंक’ करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
राज्यात सध्या एक लाख आठ हजार पाच अंगणवाडी केंद्रे आहेत. तेथे चार हजार पर्यवेक्षक आणि दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत, तर एक लाख दहा हजार इतकी शाळांची संख्या आहे. यातील बहुतांश अंगणवाड्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या परिसरात आहेत. मात्र प्राथमिक शाळा शिक्षण विभागाच्या तर अंगणवाड्या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित येतात. आता अंगणवाडी व शाळेचे एकत्रीकरण करताना या दोन्ही विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्याच्या शिक्षण सचिवांनी सोमवारी सर्व जिल्हा परिषदांना लेखी आदेश बजावून या दोन विभागांची समन्वय बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सात दिवसात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या केंद्र शाळांशी जोडून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.
दोन विभागांच्या आकडेवारीत तफावतशिक्षण विभागाने यूडायस प्रणालीत संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, ४३ हजार अंगणवाड्या या प्राथमिक शाळांच्या प्रांगणातच (को-लोकेटेड) आहेत. परंतु, एकात्मिक बालविकास आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, अशा अंगणवाड्यांची संख्या केवळ सहा हजार आहे. या दोन्ही विभागांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे.
‘लिंकिंग’नंतर काय होणार?शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना पूरक अध्यापन-अध्ययन साहित्य पुरविले जाणार आहे. ‘आकार’ अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील.
एकत्रीकरण कशासाठी?३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडीत पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. ६ वर्षे पूर्ण झाल्यावर ही मुले प्राथमिक शाळेत जातात. मात्र अंगणवाडीत ही मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण झालेली नसल्याने प्राथमिक शिक्षणातही मागे पडतात. त्यामुळे प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्र यांनी एकत्र आणून दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाणार आहे.