लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वणी तालुका व परिसरात नागपुरातून मोठ्या प्रमाणात दारूचा अधिकृत पुरवठा केला जातो; परंतु हा पुरवठा केवळ कागदावर राहत असून, प्रत्यक्षात ही दारू मार्गातच चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत असल्याचा खळबळनजक प्रकार पुढे आला. दारूचा हा प्रवास शोधण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे. वणी- पांढरकवडा विभागातील अनेक दारू विक्रेत्यांच्या नावे नागपूरच्या गोदामातून निघणारा माल परस्परच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविला जात आहे. वणीमध्ये जवळ दारू उपलब्ध असताना ती नागपूरवरून आणली जाते. यातच या दारूतस्करीचे रहस्य दडले आहे. नागपुरात दारूचे होलसेलर असून, त्यांची मोठमोठी गोदामेही आहेत. वणीतून नागपुरात दारूची ऑर्डर नोंदविली जाते; परंतु ती केवळ कागदावर असते. या दारूच्या वाहतुकीसाठी नागपूर- जाम- वरोरा- वणी, अशी वाहनाची टीपी (वाहतूक पास) बनविली जाते; परंतु प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत ही दारू रिकामी केली जाते. ती वणीत पोहोचतच नाही. कागदावर मात्र ती पोहोचलेली असते. त्यापोटी ५० ते १०० रुपये पेटी रक्कम वणी विभागातील परवानाधारकाला दिली जाते. वणीऐवजी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत हे दारूचे वाहन पकडले गेल्यास चालक रस्ता विसरला, चुकून तिकडे गेला, अशी ठेवणीतील कारणे पुढे केली जातात. देशी दारूची भट्टी, बीअरबार असेल,, तर त्याला बॉटलचे सील तोडून दारू विकण्याचे बंधन आहे आणि वाईन शॉप असेल, तर त्याला सीलबंद बॉटल विकण्याचे बंधन घातले गेले आहे. देशी दारूचे दुकान बाजारपेठेत असेल, तर एका दिवशी जास्तीत जास्त ५० ते ७० पेटी दारू विकणे शक्य आहे; परंतु प्रत्यक्षात वणी विभागातील अनेक दुकानदार एका दिवशी ५०० ते १,००० पेटी दारू विकल्याचे रेकॉर्डवर दाखवितात. १,००० पेटीमध्ये एक लाख बॉटल असतात. एका व्यक्तीने तीन बॉटल दिवसभरात पिल्यातरी किमान २५ हजार खरेदीदारांची रांग एका दारू दुकानापुढे लागणे अपेक्षित आहे. मात्र, आजतागायत कुणीही दारू दुकानापुढे अशी रांग पाहिलेली नाही. दारू विक्रेते या माध्यमातून उघडपणे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. वणी विभागात कुलदीप, अण्णा हे या व्यवसायातील मास्टर माइंड असल्याचे बोलले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या नावावर परस्परच चंद्रपुरात अशा पद्धतीने दारूची अवैधरीत्या पुरवठा-वाहतूक केली जाते. यवतमाळातून अनेकदा अशा वाहतुकीसाठी व्हीआयपी वाहनांचा वापर केला जातो. वाहनात खास अंडरग्राउंड सोय यासाठी केलेली राहते. किमान ३० पेट्या त्यात बसविल्या जातात, तर कधी कॅप्सूल ट्रकचा वापरही दारू तस्करीसाठी होतो. यवतमाळातूनही भंडाऱ्याच्या नावाने परवानाप्राप्त दारूची वाहतूक केली जाते. त्यासाठी यवतमाळ- कळंब- राळेगाव- वडनेर- जांब- पवनी-भंडारा, अशी वाहतूक पास (टीपी) तयार केली जाते. प्रत्यक्षात ही दारू जांबमध्ये खाली करून दुसऱ्या वाहनाद्वारे चंद्रपूर जिल्हा सीमेत पोहोचविली जाते. आर्णी मार्गावरून पुरवठा होणाऱ्या दारूबाबत हा फंडा अधिक प्रमाणात वापरला जात असल्याचेही बोलले जाते. अनेकदा नागपूर- यवतमाळातील होलसेलरकडे माल नाही, असे कारण सांगून राज्याच्या विविध भागांतून दारू अशा पद्धतीने बोलविली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असली तरी तेथील शौकिनांची दारूची तहान यवतमाळातून भागविली जाते. त्यासाठी केवळ कागदावर वणीमध्ये दारूची ऑर्डर नोंदवून पुरवठा मात्र प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्यात करण्याचे फंडे वापरले जातात. सीसीटीव्हीपुढे गाडी खाली करण्याच्या आदेशाचे काय ? दारूची गाडी खाली करताना ती सीसीटीव्हीमध्ये व्हावी व त्याचे फुटेज सादर करावे, असे आदेश एक्साइजने सर्व परवानाधारकांना दिले होते. मात्र, अलीकडे या आदेशाची अंमलबजावणी थंडबस्त्यात आहे. त्यामुळेच दारू परस्पर चंद्रपूर जिल्ह्यात वळती करण्याचे प्रकार घडत आहेत. एक्साइजच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन खरेदी, पुरवठा, साठा याचा ताळमेळ तपासणे बंधनकारक आहे. मात्र, मिलीभगतमुळे कागदोपत्री ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रकार एक्साइजमध्ये सुरू असल्याचे सांगितले जाते. बंदी असतानाही छुप्या पद्धतीने चंद्रपुरात जाणाऱ्या दारूवर तेथे ‘एलसीबी’कडून प्रतिबॉक्स ४०० रुपये ‘टोल’ लावला जात असल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात आहे. एकूणच दारूच्या या तस्करीत नागपुरातील ‘हर्रासा’चा ‘पूर’ आला असून एक्साइज व पोलिसांपुढेही तगडे आव्हान उभे केले आहे.
दारूच्या सर्व परवानाधारकांकडे सीसीटीव्ही लागलेले आहेत. एक्साइजचे अधिकारी तपासणीदरम्यान तेथील फुटेजची पाहणी करतात. त्याची हिस्ट्री तपासली जाते. वणीच्या नावाने वाहतूक पास घेऊन निघालेली दारू परस्पर चंद्रपूर जिल्ह्यात जात असताना तेथील पोलिसांनी पकडली व कारवाई केली. त्यातून हा प्रकार सिद्ध झाला. त्यादृष्टीने आम्ही आता सतर्क झालो असून, वॉच ठेवला जात आहे. -सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ