अविनाश साबापुरे, यवतमाळ : राज्यात एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता राज्यातील सव्वासहा लाख प्रौढ निरक्षरांचीही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी ही तीन तासांची लेखी परीक्षा होणार आहे. याबाबत योजना शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.
राज्यासह संपूर्ण देशात १५ वर्षांवरील निरक्षरांसाठी नव भारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत किती प्रौढ निरक्षर आता साक्षर झाले याची चाचणी रविवारी घेतली जाणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्रात आतापर्यंत सहा लाख २१ हजार ४६२ प्रौढ निरक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी झाली आहे. या सव्वासहा लाख लोकांची परीक्षा घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पाच लाखांहून अधिक लोक ही परीक्षा देतील असा अंदाज शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
या परीक्षेसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून अवर सचिव प्रदीप हेडाऊ १६ ते १८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. परीक्षा कामात अडथळे आणाणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना योजना संचालनालयाने दिल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती परीक्षार्थी?
अहमदनगर : १३,४७१, अकोला : २४,६९९, अमरावती : ३०,५४३, छत्रपती संभाजीनगर : १६,२१७, भंडारा : ९,०९३, बिड : ११,९१२, बुलडाणा : १४,१३४, चंद्रपूर : ३६,७४६, धुळे : १०,१०४, गडचिरोली : ६०,७७७, गोंदिया : ९,२९४, हिंगोली : ११,४९०, जळगाव : ६७,५७५, जालना : १५,२८६, कोल्हापूर : २,८०५, लातूर : ४,६०९, मुंबई १९,९३१, नागपूर : १२,२६८, नांदेड : २१, ३९०, नंदूरबार : ३१,२४२, नाशिक : ३३,२७९, धाराशिव : ५,५४५, पालघर : १६,३०२, परभणी : २०,०२५, पुणे : १०,७१८, रायगड : ९,३७३, रत्नागिरी : १५,१७९, सांगली : ७,८९५, सातारा : ५,०५९, सिंधुदुर्ग : २६१, सोलापूर : १९,२२४, ठाणे : २०,८२१, वर्धा : १,८१७, वाशिम : १८,१४४, यवतमाळ : १४,२३४, एकूण महाराष्ट्र : ६,२१,४६२
अशी असेल प्रश्नपत्रिका :
प्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.
असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर येत्या रविवारी न चुकता सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या सवडीने स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहावे. - डॉ. महेश पालकर, योजना शिक्षण संचालक
ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी झालेली आहे, ती शाळाच परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे. - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ