लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. यातून अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत मोफत शिवभोजन थाळीने अनेकांना दिलासा दिला आहे. गुरुवारपासून मोफत शिवभोजन थाळीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. जिल्ह्यात २१ शिवभोजन केंद्रे आहेत. या ठिकाणांवरून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जाणार आहे. २,२५० लाभार्थी या ठिकाणांवरून शिवभोजनाचा लाभ घेत आहेत. मोफत शिवभोजनामुळे ही संख्या दुप्पट वाढण्याचा अंदाज केंद्रचालकांनी व्यक्त केला आहे. मोफत शिवभोजनामुळे रुग्णांचे नातेवाईक, भिक्षेकरी, कामगार यासह गरजवंतांना एका वेळच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. काही नागरिकांनी दोन वेळेस जेवणाची व्यवस्था झाली तर मोठा आधार मिळेल, असे मतही ‘लोकमत’कडे व्यक्त केले. रात्रीच्या वेळी सर्व काही बंद राहते. अशा परिस्थितीत पोटाला दोन घास मिळाले तर त्याचा फायदाच होणार आहे. शिवभोजनाची व्यापकता वाढविण्याची मागणी गावपातळीवरून होत आहे.
थाळीचा लाभ घेणारे
शिवभोजन थाळीने मोठा दिलासा मिळाला आहे. किमान एका वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली. यामुळे हाताला काम नसले तरी पोटापाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे. शासनाने सुरू केलेली योजना चांगली आहे. याचा मी दररोज लाभ घेत आहे.- मनोज दातार
लाॅकडाऊनमध्ये रोजगार भेटत नाही. मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक यांना या काळात शिवथाळी मोलाचा आधार ठरत आहे. यामुळे जेवणाची गैरसोय टळली आहे. रात्रीच्या वेळी शिवभोजन थाळी मिळाली तर त्याचा मोठा आधार होईल. कारण लाॅकडाऊनमध्ये सारेच बंद आहे. - विशाल पवार
शिवभोजन एक वेळेस नाही तर दोन वेळेस मिळाले पाहिजे. मग, चिंताच राहणार नाही. यातून पोटाला मोठा आधार मिळाला आहे. मोफत भोजनाची व्यवस्था १५ दिवसच नव्हेतर, पुढेही कायमस्वरूपी असावी. - गजानन निघोट
दररोज अनेकांना मिळतो लाभ...
वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार आहे. एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते.
भिक्षेकरी, कामगार, वाटसरू, सुशिक्षित बेरोजगार यासह अनेकांना शिवभोजन केंद्रावर भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे रोजगार नसला तरी पोटापाण्याची व्यवस्था झाली आहे.