अलीकडच्या काळामध्ये विविध साधने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगतीने ज्ञानार्जन करणे सोयीचे वाटत असल्याने गुरुजी व शाळेचे महत्त्व पालकांच्या मनात कमी होताना दिसत होते. तालुक्यातील शाळा नसली, गुरुजी नसले तरी घरगुती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलं ही शिकू शकतात अशी मानसिकता पालकांची बनलेली दिसत होती; परंतु कोविडच्या संकटामुळे शाळा लॉक झाल्या व हळूहळू ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेला महत्त्व आले; परंतु शाळा असली की, कुटुंबासह विद्यार्थ्याची दिनचर्या एका बंधनात असते. विद्यार्थी भल्या पहाटेपासून शाळेच्या तयारीसाठी लवकर उठतो, शाळेची तयारी करून दिलेला गृहपाठ, स्वाध्याय वेळच्या वेळी सोडवितो, वेळेवर जेवण करतो, शाळेत सकाळी ११ ते ५ दरम्यान शिक्षक व मित्रांना भेटल्याने वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होऊन परिपाठापासून ते दिवसभर सर्वांशी समायोजन साधून खेळ, क्रीडा, गप्पा, गाणीगोष्टी, वाचन, लेखन, पाठांतर, कृती यांच्यासह दहा नैतिक मूल्यांप्रमाणे वागण्याचा-बोलण्याचा प्रयत्न करतो. परिपाठातील राष्ट्रगीत, प्रार्थना, संविधान, बातम्या, दिनांक, वार, दिन विशेष, सुविचार, चिंतन, मनन, मौन आदींमुळे एक स्वतंत्र जीवनशैली निर्माण होते. या सर्व जीवनशैलीपासून पाल्य वंचित राहिल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मुले ऑनलाइन अभ्यास करताकरता इतर मार्गाला लागण्याबरोबरच स्वमग्न व विविध आजारांनी ग्रस्त होण्याबरोबरच अभ्यासाचा कंटाळा करू लागली आहेत. लेखन व गणिती क्रिया करण्याचे विसरल्यागत वातावरण निर्माण झाले आहे. पांढरकवडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तर पालकांचे ऑनलाइन शिक्षणाला सहकार्य मिळत नाही.
लॉकडाऊन काळात आमची मुले अभ्यास करीत नाहीत. ऑनलाइन व्हिडिओ पाहत नाहीत. आम्हालाही त्यांना वेळ देता येत नाही. शेतीची कामे, मजुरीची कामे आहेत. मोबाइल घेऊन जावे लागते. रिचार्ज नाही मुले अभ्यास करीत नाही. चिडचिड करतात, दंगामस्ती करीत आहेत, त्रास देत आहेत, यामुळे आम्ही फार त्रस्त झालो गुरुजी, शाळा केव्हा सुरू होते, अशी वाक्ये एरव्ही शाळेकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या पालकांच्या तोंडून ऐकू येत आहेत. एकच पालक नाही तर, असे अनेक पालक या विषयी चिंताग्रस्त दिसत आहेत. ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व नाही, तर शाळा केव्हा सुरू होत आहे, अशी वारंवार विचारणा शहर व तालुक्यातील पालक करताना दिसत आहेत.