लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास मनाई राहणार आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यातील मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनवर शासन स्तरावरून जोर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गुरुवारी सायंकाळपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार आता बाजारपेठेची वेळ सकाळी ९ ते रात्री १० अशी राहणार आहे. हॉटेल, ढाबे, बार यांच्यासाठीही हीच वेळ ठेवण्यात आली आहे. त्यातही कोरोनाचा उद्रेक असलेल्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा या शहरांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके गठित करण्यात आली असून ही पथके लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवर नजर ठेवणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, यात्रा, धार्मिक कार्यक्रम यावर ब्रेक लावण्यात आला आहे. लग्नसमारंभाला केवळ ५० व्यक्तींची परवानगी राहणार आहे. त्यापेक्षा अधिक व्यक्ती दिल्यास मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी मंगल कार्यालयांवर छुप्या धाडी व तपासणीची व्युहरचना करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबे, बार, रेस्टॉरन्ट येथेही मंजूर क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे.एकासोबत २० जणांना तपासणारकोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर राहणार आहे. आता एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपकार्तील २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच पॉझिटिव्ह रुग्णाचा रहिवासी परिसर चहूबाजूने सील केला जाणार आहे.