अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो. त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहे. त्यातच अनेक रस्त्यांवर अतिक्रमणही वाढले आहे. मुख्य चौकात पोहोचणारे सर्व रस्ते अरुंद आहे. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होऊन अपघाताचा धोका वाढतो. मुख्य रस्त्यांना दुभाजक लावलेले आहे. परंतु या रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे दररोजच छोटेमोठे अपघात घडत आहेत. माहेश्वरी चौक, गायत्री चौक, बसस्थानक चौक, नगरपरिषद गार्डन परिसर, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले दुकाने थाटलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांनी जागा काबीज केल्या आहे. संभाजी उद्यान ते माहेश्वरी चौक या दरम्यानच्या बोळ वजा अरुंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे. तरीही तेथे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने सर्रास उभी केली जातात. माहेश्वरी चौकाच्या तिहेरी वळणावर अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने सतत उभी असतात. हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती आहे. तरीही वाहतूक पोलीस गप्प का असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पेट्रोल पंपापासून विश्रामगृहापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.सुसाट तरुणांंना लगाम कोण घालणार?उमरखेड शहरातील अनेक तरुण सुसाट वेगाने वाहने चालवितात.परंतु त्यांना आवर घालण्याची जबाबदारी असलेले वाहतूक पोलीस ऐनवेळी बेपत्ता होतात. माहेश्वर चौक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावली जाते. परंतु विस्कटलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पोलीस कधीच कर्तव्य बजावताना दिसत नाही.