लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:18 PM2018-07-30T14:18:04+5:302018-07-30T14:18:50+5:30
दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर काँग्रेसचीही गावखेड्यापर्यंत नव्याने सूक्ष्म पक्षबांधणी केली जात आहे. त्याचे नियंत्रण थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी करीत आहे. ‘वन बुथ, टेन युथ’ हा नवा कार्यक्रम काँग्रेस खास युवकांसाठी राबवित आहे.
उमेदवारीत युवकांनाही ‘कोटा’
काँग्रेसची ही नवी रचना व बांधणी युवकांना व पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत देत आहे. यापुढे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचे मतही विचारात घेतले जाईल, असे संकेत मिळत आहे. युवकांवर पक्षबांधणीची जबाबदारी देत असतानाच त्यांना सर्वच निवडणुकांमध्ये जागा वाटपात अधिकाधिक स्थान (कोटा) दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी
जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपीठावर बहुतांश खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या. युवकांसाठी या खुर्च्या मी रिक्त ठेवल्या आहेत, समोर बसलेल्यांमधून सक्षम व्यक्तींना उचलून या खुर्च्यांवर बसविले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. राहुल गांधींनी दिलेला हा शब्द ‘वन बुथ टेन युथ’च्या माध्यमातून पाळला जात असल्याचे मानले जाते.
‘शक्ती अॅप’द्वारे थेट राहूल गांधींच्या पोर्टलवर कनेक्टीव्हीटी
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोनशे ते सव्वादोनशे बुथ राहणार आहे. प्रत्येक बुथला ८०० ते १२०० मतदार कनेक्ट राहतील.
या बुथमध्ये दहा सदस्य राहणार आहेत. त्यातील एक बुथ प्रमुख, दुसरा समन्वयक राहणार आहे. उर्वरित आठ सदस्य असतील.
या मतदारसंघातील जातनिहाय लोकसंख्येच्या आधारावर बुथ सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. त्यातही युवक आणि ज्येष्ठ असा समतोल साधला जाईल.
बुथ सदस्य म्हणून संधी दिल्या जाणाऱ्यांची सर्व पैलूंनी माहिती, रेकॉर्ड, सामाजिक पत, पक्षासाठी योगदान, निष्ठा आदी बाबी तपासल्या जाणार आहे.
या बुथच्या सदस्यांना काँग्रेसच्या ‘शक्ती अॅप’द्वारे थेट राहुल गांधींच्या कार्यालयांच्या पोर्टलवर कनेक्ट केले जाईल.
हे कार्यालय केव्हाही या सदस्यांशी संपर्क साधू शकेल. तर हे सदस्यसुद्धा या अॅपद्वारे थेट राहुल गांधींना आपल्या भागातील पक्षस्थिती, पदाधिकाऱ्यांची कनेक्टीव्हीटी, उपयोगिता, आपल्या क्षेत्रातील समस्या सांगू शकतील.
त्या-त्या मतदारसंघाचा लोकसभेचा व विधानसभेचा उमेदवार निश्चित करताना या बुथ सदस्यांची मते, शिफारसी, सूचना आवर्जुन विचारात घेतल्या जाणार आहे. त्यांची मतेही क्रॉस चेक केली जातील.
या बुथ मधून येणाऱ्या शिफारसींच्या आधारावरच काँग्रेसचा आगामी लोकसभा व विधानसभेचा उमेदवार निश्चित होणार आहे. यापुढे पक्षाचा कोणताही उमेदवार थेट दिल्लीतून ठरणार नाही, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले.