स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:09 PM2019-04-12T15:09:10+5:302019-04-12T15:23:33+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे.
यवतमाळ - लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मात्र तेथून मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
ईव्हीएम हॅक होऊ नये म्हणून स्ट्राँग रुम परिसरात जामर लावण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे ईव्हीएम मोबाईल संपर्कात येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. सुमारे दीड महिना अर्थात २३ मेपर्यंत ईव्हीएम या स्ट्राँग रुममध्ये राहणार असल्याने तेथे जामरसह विविध उपाय योजना कराव्या, ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनातून केली आहे.
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारी (11 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले आहे. या मतदानला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.