लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या भावना गवळी एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.मतमोजणीचे २७ व्या फेरीचे वृत्त हाती आले तेव्हा भावना गवळींना पाच लाख ८ हजार ३९१ तर माणिकराव ठाकरे यांना चार लाख ६४७ मते मिळाली होती. गवळी यांच्या मतांची आघाडी एक लाख १० हजार २४८ एवढी होती. मतमोजणीच्या आणखी तीन फेऱ्यांचे निकाल येणे बाकी होते. सलग पाचव्यांदा संसदेत जात असलेल्या भावना गवळी शिवसेनेतील एकमेव महिला खासदार म्हणून मंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार युतीचे आहेत. त्यातच मोदींची सुप्त लाट याचा फायदा गवळी यांना झाल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. प्रवीण पवार यांनी ८६ हजार ८०४ मते घेतली. भाजप बंडखोर पी.बी. आडे यांना २३ हजार मते मिळाली. ते फारसा चमत्कार दाखवू शकले नाही. प्रहारच्या वैशाली येडे यांना १९ हजार तर बसपाच्या अरुण किनवटकर यांना ९ हजार मते मिळाली. तीन हजार ६९० मतदारांनी नोटाला पसंती दिली. सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मतांची आघाडी मिळाली. त्यातही राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, वाशिम या मतदारसंघांनी शिवसेनेला मोठी आघाडी मिळवून दिली. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंना पुसद व राळेगावातून सर्वाधिक अपेक्षा होती. मात्र अनपेक्षितरीत्या तेथे सेनेला मदत मिळाली. विशेषत: राष्टÑवादीचे वर्चस्व असलेल्या पुसदमध्येसुद्धा काँग्रेसला आघाडी मिळविता आलेली नाही. शिवसेनेच्या भावना गवळी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेऊन होत्या. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. २०१४ च्या तुलनेत यावेळी काँग्रेस व शिवसेनेला अधिक मते मिळाली. २०१४ मध्ये सेनेला असलेली ९३ हजार मतांची आघाडी यावेळी दहा ते १५ हजाराने वाढून एक लाखांवर गेली. १९ लाखांपैकी ११ लाख ६० हजार (६१ टक्के) मतदारांनी ११ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मोजणी गुरुवारी दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामातून सुरू झाली. सायंकाळी शिवसैनिकांनी शहरातून ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष केला.हा विकासाचा विजय - गवळीआपण गेली २० वर्षे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत असून या काळात विविध विकास कामे खेचून आणली. त्या विकासालाच मतदारांनी पसंती दर्शवित मला पा
चव्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली. या विजयामागे मतदारांची पसंती व सामान्य कार्यकर्त्यांचे परिश्रम महत्वाचे ठरले.- भावना गवळीखासदार, शिवसेनाबॉक्सपराभव मान्य - ठाकरेमतदारांनी दिलेला कौल काँग्रेसला मान्य आहे. सरकारबाबत समाजाच्या सर्वच स्तरात प्रचंड नाराजी होती. परंतु ही नाराजी मतांमध्ये परावर्तीत करण्यात आम्ही अपयशी ठरलो. या पराभवाची कारणमिमांसा केली जाईल. पक्ष-संघटन बांधणीसाठी आणखी जोमाने कामाला लागू.- माणिकराव ठाकरेकाँग्रेस.