लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे. या महिलेला समाजातून निवडणूक निधीसाठी मोठे अर्थसहाय मिळत असून अवघ्या सहा दिवसात तब्बल दहा लाखांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यावरून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल लक्षात येतो आहे.आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे. अंगणवाडी मदतनीस असलेल्या वैशाली शेतकरी विधवा आहेत. शेतकरी व शेतमजुरांचे दु:ख त्या जाणून आहेत. म्हणूनच त्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात थेट लोकसभेची उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय आमदार कडू यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला जनतेतून आणि विशेषत: शेतकरी कुटुंबांमधून तेवढाच प्रतिसादही मिळतो आहे. गरीब महिला उमेदवार असल्याने प्रचारासाठी निधी आणायचा कोठून याची चिंता प्रहार कार्यकर्त्यांना भेडसावत होती. अखेर त्यांनी यावर जेथे जेथे प्रचाराला जाऊ तेथे मदतनिधीसाठी झोळी फिरवू हा मार्ग निवडला. वैशाली येडे यांनी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रहार कार्यकर्त्यांनी झोळी फिरविली. सहाही विधानसभा मतदारसंघात प्रहार कार्यकर्ते बाजारात लोकवर्गणीचा मदतीचा डबा घेऊन फिरत आहे. त्याला व्यापारी, व्यावसायिक, सामान्य नागरिक एवढेच काय शाळकरी विद्यार्थीही मोठा प्रतिसाद देत आहेत. या झोळीतून अवघ्या सहा दिवसात पाच लाख रुपये तर बँक खात्यात पाच लाख असे एकूण दहा लाख रुपये वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी गोळा झाले आहे. लोकवर्गणी येणे अद्याप सुरुच आहे. या निधीमुळे प्रचाराला मोठा हातभार लागला. गावागावातून समाजातील तमाम घटक शेतकरी विधवा वैशाली येडे यांच्या उमेदवारीने प्रभावित झाले असून त्यांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे.वैशाली यांना मध्यवर्गीय व गोरगरीब कुटुंबाकडून मदत मिळत असल्याने त्यांची मतांमधील व्याप्ती वाढते आहे. ही व्याप्ती काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरते आहे. कारण प्रहारच्या उमेदवारामुळे युती व आघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. बैलगाडीतून एन्ट्री, झोळी या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रहारचा उमेदवार लक्षवेधक ठरला आहे. लोकवर्गणीतून मिळणारा हा प्रतिसाद ११ एप्रिलला मतपेटीतही पूर्णत: मिळतो का याकडे नजरा लागल्या आहेत.
Lok Sabha Election 2019; ‘प्रहार’च्या उमेदवारासाठी दहा लाखांंची लोकवर्गणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 9:18 PM
दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे.
ठळक मुद्देशेतकरी विधवेला गावागावांत निवडणुकीसाठी अर्थसहाय