पुसद : तालुक्यातील गायमुखनगर ग्रामपंचायतीमधील गावात कोरोनाबाबत कोणतेही नियोजन नाही. गावात बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही. गावात कोरोनाबाबत कोणताही उपक्रम राबविला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण केले नाही. पावसाळा तोंडावर असून गावात विविध समस्या कायम आहेत. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत नाही. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. शासनाच्या विविध योजनांतर्गत प्राप्त निधीमधून गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु, त्यातही अनियमितता आहे. नाल्यांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून घरात जाण्याची शक्यता आहे.
सध्या नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. संबंधित पदाधिकारी समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीवर काहीच फरक पडत नाही. आता तरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.