विडूळ : उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचदेव) परिसरात शनिवारी तब्बल दीड तास पाऊस कोसळला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
धानोरा (सा) गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी केली होती. पावसामुळे पेरलेले सोयाबीन शेतातून अक्षरशः वाहून गेले. अनेकांची जमीन खरडून गेली. नाल्या काठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातही पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन अनेक घरात पाणी शिरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
गावात साधी विचारपूस करण्यासाठी तलाठी येऊन गेले. मात्र, ते कोणालाही दिसले नाही. तलाठ्याबाबत गावात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसामुळे धानोरासह ब्राह्मणगाव, चालगणी, विडूळ, वांगी शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्यास संबंधित तलाठ्यास कळविल्याचे सांगितले.
110721\img-20210711-wa0121.jpg
ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान