लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप घोषित झाल्या नाहीत. मात्र शुक्रवारी मुंबईत अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पुरुष उमेदवारांना संधीची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा तिढा कायम आहे. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत जिल्हा परिषदेची निवडणूक अडचणीत सापडली आहे. गट आणि गणांच्या पुनर्रचनेनंतर ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला नाही. नवीन सरकारच्या निर्णयामुळे नव्याने जुन्या गटांचे आरक्षण काढावे लागणार आहे. ती प्रक्रियासुद्धा अद्याप सुरू झाली नाही. गेल्या पाच वर्षात दोन्ही वेळा अध्यक्षपदी महिलांना संधी मिळाली. पुरुष सदस्यांना उपाध्यक्ष आणि सभापतीपदांवर समाधान मानावे लागले. गेल्या दोन्ही वेळी अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित निघाले होते.
माजी सदस्यांमध्ये सुरू झाली चढाओढ - अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने यावेळच्या निवडणुकीत माजी सदस्यांमध्ये चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक माजी पदाधिकारी पुन्हा निवडणूक लढवून अध्यक्षपद काबीज करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आतापासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे.
नवीन आरक्षणाकडे रोखल्या नजरा - महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेच्या जागा वाढवून आरक्षणही काढले होते. आता जुन्याच गटाप्रमाणे निवडणूक होणार असल्याने नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे. या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून अधिकृतरीत्या आरक्षणाचा कार्यक्रमही घोषित झाला नाही.