अखिलेशकुमार सिंग : वणी येथे पार पडला निरोप व सत्कार समारंभवणी : कोणत्याही कठिण प्रसंगात आम्ही नेहमीच माधव गिरी यांचा सल्ला घ्यायचो. त्यामुळे ते आमचे गुरूजी आहेत, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले. वणीचे एसडीपीओ माधव गिरी यांच्या सेवानिवृत्ती निमीत्त येथे बुधवारी पार पडलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. सिंग पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोणतीही गंभीर घटना झाली की आम्हाला वरिष्ठांकडून माधव गिरी यांचा सल्ला घेण्याचे सूचविले जात असे. आम्हीसुद्धा महत्त्वपूर्ण प्रकरणात गिरी यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही कारवाईला प्रारंभ करीत नव्हतो. यवतमाळ येथील अनेक गंभीर प्रकरणात गिरी हे माझ्या गुरूजीप्रमाणे सोबत राहून मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी गुरू ठरले. सत्काराला उत्तर देताना माधव गिरी म्हणाले, ३५ वर्षांच्या काळात मी विविध पोलीस ठाण्यात आलेल्या अनेक अन्यायग्रस्त नागरिकांना आपुलकीची वागणूक देऊन त्यांना सहकार्य केले. या प्रामाणिकपणामुळेच अनेक नागरिकांना पोलिसांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने खाकी वर्दीचा उन्माद न आणता, जनतेला सहकार्य करावे, असे आवाहन गिरी यांनी केले. त्यांनी यावेळी ३५ वषाच्या पोलीस सेवेतील अनेक प्रसंग व अनुभव कथन केले. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद पटोले, प्रा.पुरूषोत्तम पाटील उपस्थित होते. यावेळी माधव गिरी, त्यांच्या पत्नी व आईचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील संघटना, शिवसेना व अन्य संघटनांच्यावतीनेही माधव गिरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विचार मांडले. प्रास्ताविक ठाणेदार मुकूंद कुळकर्णी तर संचालन रवी साल्पेकर यांनी केले. आभार शिरपूर ठाणेदार सागर इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागातील पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
माधव गिरी जिल्हा पोलीस दलाचे गुरू
By admin | Published: September 02, 2016 2:35 AM