९ जुलैचा काळा दिवस : धावंडा पूरग्रस्तांची अवस्था ‘जैसे थे’सुनील हिरास - दिग्रसबेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. या काळरात्री १४ जिवांचा बळी गेला. शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर आश्वासनांची खैरात वाटली. मात्र एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. आजही पूरग्रस्त आहे त्या स्थितीतच जीवन जगत आहे. धावंडाचा महापूर ओसरून नऊ वर्षे झाली तरी डोळ्यात मात्र महापूर कायम आहे. दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ साली फुटले. धावंडा नदीला महापूर आला. क्षणभरात अर्धे दिग्रस शहर जलमय झाले. नदीतिरावरील परिसरासह देवनगर, जिजामातानगर, पोळा मैदान, संभाजीनगर, मोतीनगर, गंगानगर, बापूनगर, बजरंगनगर आदी परिसर जलमय झाला. रात्री आलेल्या महापुराने बेसावध नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली. डोळ्यासमोर घरे वाहून जाताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग आला. या महापुराने १४ निष्पापांचे बळी घेतले. महापूर ओसरल्यानंतर अनेकांनी दिग्रसला भेट दिली. मदतीचे आश्वासन दिले. प्रशासनाने निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था केली. मात्र नऊ वर्षे झाले तरी पूरग्रस्त त्याच वेदना घेऊन जगत आहे. ९ जुलैचा दिवस उजाडला की, नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. आप्त स्वकीयांचे डोळे अश्रूंनी भरुन येतात. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातील महापूर कुणालाही आता दिसत नाही. घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर अनेक कुटुंब झोपडीवजा घरात राहत आहे. कोणतीही सुविधा नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून पूरग्रस्त थकले आहे. प्रत्येकवेळी घरकूल पूर्ण झाले की, हक्काचे घर मिळेल, असे आश्वासन दिले जाते. मात्र भवानी टेकडी परिसरातील घरकुलाची सध्यस्थिती पाहिली तर स्वप्न आगामी काही वर्षातही पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने ९५२ घरकुलांची महत्वाकांक्षी योजना आखली.परंतु राजकीय हेव्यादाव्यात घरकुलांचे कामच पूर्ण झाले नाही. प्रसिद्धीसाठी चारवेळा या कामाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्येकवेळी राजकारणच आडवे येत गेले.
पूरग्रस्तांच्या डोळ्यात महापूर कायम
By admin | Published: July 08, 2014 11:42 PM