यवतमाळ : खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांनाही पुढच्या आयुष्यात स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होता यावे, त्यासाठी बालवयातच त्यांचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने गेले वर्षभर ‘महादीप’ हा उपक्रम शाळांमध्ये राबविला. मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले.
अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा घेणारी आणि त्यासाठी वर्षभर विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम पुरवून सतत सराव करून घेणारी यवतमाळ जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकमेव ठरली आहे. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सुरुवातीला एकट्या दारव्हा तालुक्यापुरता या संकल्पनेचा जन्म झाला होता. मात्र यावर्षी तो संपूर्ण जिल्ह्यात राबविला गेला. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर परीक्षा घेतली गेली. त्यातून ४१७ विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवडले गेले होते. ही जिल्हास्तरीय परीक्षा मंगळवारी येथे पार पडली. यावेळी मराठी माध्यमाचे ३६७ पैकी ३६६ तर, उर्दू माध्यमाचे ५० पैकी ४४ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. दररोज शिक्षण विभागातून आलेल्या लिंकमुळे स्पर्धा परीक्षेतील अनेक पाठ्यक्रमांचा उत्तम सराव झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर एक तासात काहींनी अर्ध्या तासात तर काहींनी चक्क २० मिनिटांत सोडविला.
सकाळी परीक्षा, सायंकाळी निकाल, लगेच विमानवारी
जिल्हास्तरीय परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून शिक्षकांच्या ऐवजी विस्तार अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. तर स्वत: शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर हजर होते. यावेळी पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक यांच्याकडून सर्व परीक्षार्थ्यांना आहार वाटप करण्यात आला. तर परीक्षा झाल्याबरोबर ४१० ही विद्यार्थ्यांच्या पेपरची तपासणी सुरू करण्यात आली. तर सायंकाळी परीक्षेचा निकालही घोषित करण्यात आला. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांसोबतच थेट विमानाने दिल्लीवारी घडविली जाणार आहे.
आजवर अनेक परीक्षा पहिल्या, मात्र यावेळचा प्रतिसाद काही वेगळाच होता. विद्यार्थी उत्साहाने पेपर सोडवित होते. परीक्षा केंद्राबाहेर ग्रामीण भागातून आलेले पालकही उत्सुकतेने पूर्णवेळ हजर होते. विशेष म्हणजे गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य होती.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.