येथील नगरपंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष कामी लागले होते. इच्छुकांनी डोअर टू डोअर मतदारांच्या भेटीगाठीही वाढविल्या होत्या. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. मात्र, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती.
नगरपंचायतीच्या गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनेन्वये हद्दीत झालेले बदल (क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे), विविध विकासकामे, योजनांमुळे झालेल्या भौगोलिक बदलावर आयोगाने फोकस केला आहे. नवीन रस्ते, पूल, इमारती आदी बाबी विचारात घेण्याचे आदेश दिले आहेत. संस्थांनी क्षेत्र निश्चिती करून नकाशे बनविण्याचेसुद्धा निर्देश दिले. परिणामी कोरोनामुळे समोर ढकललेल्या नगरपंचायत निवडणुका नव्या आदेशामुळे लवकरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.