महागाव : दीड महिन्यांपूर्वी नगरपंचायतमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. यात मुख्य लेखापाल आणि लिपिकावर कारवाई झाली. तेव्हापासून मुख्याधिकारी नॉट रिचेबल आहे.
कारवाईनंतर तब्बल दीड महिन्यांपासून मुख्याधिकारी नॉट रिचेबल असून, मुख्य लेखापालावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे येथे पर्यायी व्यवस्था करून कामकाज सुरळीत करणे अपेक्षित होते, परंतु मागील ४५ दिवसांपासून यंत्रणेतील कुणाचे खेटर कुणाच्या पायात नाही. सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात कुचंबणा सुरू आहे. नगरपंचायतमधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्निल कापडणीस यांच्याकडे प्रशासक म्हणून धुरा सोपविण्यात आली आहे.
मुख्याधिकारी सूरज सुर्वे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा प्रभार नायब तहसीलदार डॉ.संतोष अदमुलवाड यांच्याकडे देण्यात आला. मात्र, प्रकृतीच्या कारणावरून तेही रजेवर आहे. आता परत मुख्याधिकारी पदाचा प्रभार उमरखेड येथील सीओंकडे देण्यात आला आहे. मुख्य लेखापालाचे पद रिक्त आहे. उमरखेड येथील लेखापालास प्रभार देण्यात आला होता, असे कळते. मात्र, महागावला जाणे सोपे नाही, म्हणून त्यांनी प्रभार स्वीकारला नाही. मुख्याधिकारी आणि मुख्य लेखापाल ही दोन्ही पदे सक्षम व्यक्तीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे नगरपंचायतचा कारभार कुबड्यांवर सुरू आहे.
बॉक्स
घरकुलाच्या धनादेशावर सही कोण करणार?
रोजमजुरी करून गुजराण करणारे श्यामराव वाहुळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलाचे बांधकाम केले. घराच्या दर्शनी भागाचे प्लास्टर राहिले, म्हणून त्यांचा २० हजारांचा हप्ता अडविण्यात आला. आता काम पूर्ण करून एक महिना झाला, परंतु त्यांना पैसे मिळाले नाही. मुख्याधिकारी व लेखापाल यांची धनादेशावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत पैसे मिळत नाही. जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.