महागाव : येथील सहकार अधिकारी श्रेणी-१ सहकारी संस्था कार्यालय आता नव्या आदेशान्वये पुसदऐवजी सहाय्यक निबंधक कार्यालय उमरखेड येथे संलग्न करण्यात आले आहे. नवा आदेश १५ मार्च रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी जारी केला आहे.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी ८ ऑगस्ट २०१९ रोजी सदर कार्यालय संलग्न करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या कार्यासन अधिकारी कार्यालयाकडे मागणी केली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी आमदार नामदेव ससाने यांच्यामार्फत या मागणीचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला अखेर यश आले.
तालुक्यातील अनेक कामे पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये खोळंबून पडलेली असायची. ती आता उमरखेड येथे संलग्न झाल्यामुळे एकसूत्रता येऊन लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या आणि अन्य सहकारी संस्थेवर देखरेख करण्याकरिता महागाव व उमरखेड या दोन्ही तालुक्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय हे उमरखेड येथे एकाच ठिकाणी जोडण्यात आल्यामुळे नागरिक आणि संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. विशेष म्हणजे, याकरिता माजी आमदार राजेंद्र नजरधने हेही उत्सुक होते. परंतु त्यांचा पाठपुरावा कमी पडल्यामुळे सत्ता असताना हे कार्यालय उमरखेड येथे संलग्न होऊ शकले नाही. तेच काम आता सत्ता नसताना भाजप जिल्हाध्यक्षांनी करण्यात यश मिळविले.