संजय भगत
महागाव : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह शहरातील नागरिकांना विजेअभावी प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शहर तब्बल २२ तास अंधारात होते. डमी लाईनही कुचकामी ठरल्याने संताप व्यक्त होत आहे.
सुरळीत वीजपुरवठा मिळावा, हा ग्राहकांचा अधिकार असला तरी, महावितरण कंपनीने त्याला छेद देत तालुक्यासह शहराला तब्बल २२ तास अंधारात ठेवले. नागरिकांना दळण, पाणी व विजेवर चालणाऱ्या उपकरणांपासून वंचित राहावे लागले. खंडित वीज पुरवठ्यामुळे शासकीय कामकाज प्रभावित झाले. कामकाजानिमित्त बाहेरगावाहून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज पुरवठा अचानक बंद राहत असेल, तर महागाव, फुलसावंगी, ढाणकी अशी डमी लाईन तयार करण्यात आली आहे. या लाईनवरून इमर्जन्सी वीज पुरवठा शहराला करता येतो. लाखो रुपये खर्च करून ही लाईन तयार करण्यात आली. परंतु गेल्या काही वर्षांपासून या लाईनचा वापरच बंद करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरील लाईनमध्ये येणारे अडथळे, त्याची देखभाल व दुरुस्ती बहुतांश कागदोपत्री दाखविली जात आहे.
बॉक्स
३३ के.व्ही.चे सात उपकेंद्रही नावालाच
मुडाणा, फुलसावंगी, भवानी, आनंतवाडी, सवना, काळी दौ. आणि गुंज असे स्वतंत्र ३३ के.व्ही. उपकेंद्र सुरू असताना शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित राहतो. दोन कंत्राटदार तालुक्यात मेंटेनन्सचे काम करतात. त्यापैकी एक सेवानिवृत्त सहायक कार्यकारी अभियंत्याचा चिरंजीव आहे. कंत्राटदार मेंटेनन्सचे काम करत असतील, तर शहरात २२ तास आणि दिवसभर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न आहे.
कोट
गुंज १३२ के.व्ही. केंद्रावरून महागावकरिता येणारी लाईन पूर्णपणे कमकुवत झाली आहे. फुलसावंगी, ढाणकी या डमी लाईनचा वापर बंद आहे. अनेक जागा रिक्त आहेत. जीर्ण लाईनचे नवीन प्रस्ताव वारंवार पाठविले. पण त्याला मंजुरी मिळत नाही.
- विनोद चव्हाण,
सहायक कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, महागाव