तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर वरिष्ठांचे नियंत्रण नाही. अनेक तक्रारी असूनही जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासनाला पाठीशी घालत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाने उच्छाद केला आहे. कोविड सेंटरवर लाखो रुपये खर्च होत असताना रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रेफर करण्यावर भर दिला जात आहे. गतवर्षी सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, तालुका पत्रकार असोसिएशन, व्यापारी संघटना आदींनी स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात देत लाखोंचे साहित्य खरेदी करून दिले होते. याशिवाय जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला पुरवलेला साठा वेगळा होता.
जिल्हा स्तरावर ७४ हजार अंटीजन किटचा अजूनही थांगपत्ता लागला नाही. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब आयुकबंच्या निदर्शनास आणून दिली होती. यातील तीन ते साडेतीन कोटी रुपयांचे घबाड अजूनही जिल्हा प्रशासनाला शोधून काढता आले नाही. कोरोनाच्या मृत्यूमालिकेत तालुका बराच अग्रेसर आहे.
जून, जुलैपासून सुरू झालेल्या जिल्ह्यात मृत्यूचा शुभारंभ तालुक्यापासून सुरु झाला होता. तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे वाढता संसर्ग दर आणि मृत्युदर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. याकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, रॅपिड अँटिजन, आरटीपीसीआर तपासणी कमालीची मंदावली आहे. ७ एप्रिलपासून फुलसावंगी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. वाकान येथे रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यापूर्वी हिवरा येथे गावकऱ्यांनी स्वतःहून आठवडाभर जनता कर्फ्यू पाळला. अँटिजन ७८८०, आरटीपीसीआर ८४१५ टेस्ट करण्यात आल्या. किट किती उपलब्ध झाल्या हे आता सांगता येत नाही. सध्या तालुक्याचा रुग्ण वाढीचा दर ५पेक्षा कमी आहे. महसूल, पोलीस, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने काही उणिवा असेल, तर त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
बॉक्स
मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अँटिजन किट गायब असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर कुणी भाष्य करीत नाही. अँटिजन किटमधील अनियमितता शोधून काढण्यासाठी जिल्हास्तरावरून कारवाई होत नसल्यामुळे आता उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. नागपूर येथील विधिज्ञ यासाठी यवतमाळात शुक्रवारी दाखल होत असल्याचे सांगितले जाते.