रितेश पुरोहित महागावमागणी आणि पुरवठा याचे गणित जुळत नसल्याने तालुका भारनियमनाच्या आगेत होरपळत आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात वीज चोरीही होत आहे. या वीजचोरीला अंकुश लावण्याऐवजी अधिकारीच या चोरीला पाठबळ देत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर चक्क तारावर आकोडे टाकून वीज चोरली जात आहे. घरात मीटर नसतानाही दिव्यांचा प्रकाश मात्र घर उजाळून टाकते. महागाव तालुक्यात सात वीज उपकेंद्र आहेत. त्यात गुंज, अनंतवाडी, काळी दौलत, महागाव, मुडाणा, फुलसावंगी, भवानी या उपकेंद्राचा समावेश आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरगावावरून जाणे-येणे करतात. अधिकारीही मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे त्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणता वचक नाही. ग्रामीण भागात तर सोडा शहरातही वीज तारांवर आकोडे टाकून खुलेआम वीजपुरवठा सुरू आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू आहे. या विटभट्ट्यांवर आणि अनेक अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोटरपंपासाठी सर्व्हिस लाईनवर आकोडे टाकून वीज पुरवठा घेतला आहे. दररोज विजेची मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वीज चोरीला काही लाईनमन व अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याची चर्चा आहे. नदी-नाल्यावर बसविण्यात आलेल्या मोटरपंपावर वीज वितरणचे कर्मचारी वीज चोरीसाठी धाड मारतात. मात्र प्रकरण तेथेच निस्तारल्या जाते. याचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवर होतो. एकीकडे मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जाते. पाणीपुरवठ्यासह लघु उद्योगावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. वीज वितरण कंपनीचे महागाव येथील कामकाज पूर्णत: ढेपाळले आहे. त्यामुळेच कुणावर अंकुश नाही. वरिष्ठही या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाही.
महागाव तालुक्यात आकोडे टाकून खुलेआम वीजचोरी
By admin | Published: January 22, 2015 2:15 AM