लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५९.७३ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी १२ लाख ९८ हजार ६६३ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी ६ पर्यंत या मतदानाची टक्केवारी ६६ टक्क्यापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सर्वाधिक सरासरी मतदान राळेगाव विधानसभा क्षेत्रात झाले आहे.सात विधानसभा क्षेत्रात एकूण ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्वांचे भाग्य सोमवारी सायंकाळी मशीनबंद झाले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मतदारात उत्साह दिसून आला. बहुतांश मतदान केंद्रांवर ७० टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले आहे. पोलीस बंदोबस्तामुळे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. केवळ दिग्रस व पुसदमध्ये किरकोळ घटना घडल्या. नेहमीप्रमाणेच वणी व काही विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे मतदान काही काळ रेंगाळले. २७ बॅलेट युनिट, १८ कंट्रोल युनिट तर ५७ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड आला होता. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञाच्या मदतीने ईव्हीएम दुरुस्त करून मतदान पूर्ववत सुरू केले. सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदान उत्स्फूर्त तर शहरात संथगतीने होत असल्याचे दिसून आले. यवतमाळमधील महागाव कसबा, उमरखेडमध्ये चालगणी, पुसद शहरात, राळेगाव शहरासह इतरही मतदान केंद्रावर सायंकाळी ६ नंतर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री ७ ते ८ पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. वयोवृद्धांनी व दिव्यांग मतदारांनी आपला हक्क बजावला. आयोगाच्या निर्देशानुसार जवळपास सर्वच मतदान केंद्रावर सुसज्ज अशी व्यवस्था ठेवण्यात आली होती. दिव्यांग, गरोदर महिला मतदारांसाठी स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे राबत होते. मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याकरिता त्यांनी मदत केली.पुसद शहरातील हिंदी हायस्कूल मतदान केंद्रासमोर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. अनेक मतदारांनी पाण्यातून वाट काढत मतदानाचा हक्क बजावला. पावसामुळे रांगेत असलेल्या मतदारांची तारांबळ उडाली. त्यानंतर अनेक मतदार रेनकोट घालून केंद्रावर पोहोचले. २०१४ मध्येही ६६.०३ टक्के मतदान जिल्ह्यात झाले होते. सोमवारी झालेल्या मतदानाची सरासरीसुद्धा ६६ टक्के असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात येत आहे. अधिकृत आकडा येण्यासाठी विलंब लागणार असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी मतमोजणी२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतांची मोजणी गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी सातही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. यवतमाळ मतदारसंघाची मोजणी धामणगाव रोड स्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये केली जाईल.