यवतमाळ : राज्यावर आघाडी सरकारच्या काळात असलेले कर्ज युती सरकारमध्ये दुप्पट झाले. मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात धार्जिण्या धोरणांना स्वीकारत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतून आलेले निर्देश येथील मुख्यमंत्री कोणताही विचार न करता राबवितात. यामुळेच राज्य अधोगतीला चालले आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रपरिषदेत केला.
पवार म्हणाले, राज्यावर कर्जाचा डोंगर असताना गुजरातच्या सोईसाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला. यात हजारो कोटी रुपये महाराष्टÑ सरकारने दिले. या ट्रेन ऐवजी दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा रेल्वे मार्ग घेतला असता तर विदर्भ, मराठवाड्याला फायदा झाला असता. नाशिक, खान्देश या गुजरात सीमेजवळच्या भागात दरवर्षी अतिवृष्टी होते. येथील पाणी गुजरातकडे वाहून जाते. हे पाणी महाराष्टÑातील दुष्काळी मराठवाडा व इतर भागात वळते केल्यास सिंचनाची क्षमता वाढविणे शक्य आहे. पण यात फडणवीसांना रस नाही. उलट महाराष्टÑातील गुंतवणूक गुजरातकडे कशी वळविता येईल यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप पवारांनी केला.
गेल्या पाच वर्षात यवतमाळ शहरात कोणत्या उद्योगाची भर पडली हे सत्ताधाऱ्यांनी सांगावे, उलट येथील सुरू असलेले उद्योग डबघाईस आले आहेत. अशीच स्थिती संपूर्ण महाराष्टÑाची आहे. नाशिकमध्ये १५ हजार कामगार बेरोजगार झाले. एका एमआयडीसीची स्थिती अशी असेल तर देशपातळीवर विचारही करता येणार नाही. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. २० हजार कामगार बेरोजगार झाले. आता बीपीएल ही आॅईल कंपनी सरकारने विकायला काढली आहे. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे डबघाईस आल्या. आता त्यांनी या कंपन्या विकायला काढल्या आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून येणाºया सूचनांचे डोळेझाकपणे पालन व विरोधकांना शिव्याशाप देण्याचे काम पाच वर्ष केले. त्यामुळे आता युवा तरुणाला परिवर्तन हवे आहे. संपूर्ण महाराष्टÑाचा दौरा व विविध सभा यातून परिवर्तनाचे वातावरण दिसत असल्याचे पवार यांनी सांगितले.लिंबू, मिरचीवर विश्वास नाहीराफेल विमानाची देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी लिंबू ठेऊन पूजाअर्चा केली. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, लिंबू, मिरचीवर माझा विश्वास नाही. लिंबू, मिरची टांगून पूजा करणाºयांना धन्यच मानायला हवे!