उच्चशिक्षित, प्राचार्य, डॉक्टर आणि कॅबिनेट मंत्री असूनही अगदी साधेपणाने राहणारे, कोणत्याही ज्येष्ठाचा भरचौकातही पाया पडून आशीर्वाद घेणाऱ्या भाजप उमेदवार अशोक उईके यांची मतदारांना भुरळ पडली आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्याशी थेट होतो आहे.राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आहेत. परंतु प्रा. उईके व प्रा. पुरके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. पुरके यापूर्वी शिक्षणमंत्री होते तर उईके आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. मात्र दोघांच्या वागण्यातील विसंगती मतदारांच्या नजरेतून सुटलेली नाही. प्रा. वसंत पुरके यांची भाषणशैली उत्कृष्ट आणि टाळ्या घेणारी असली तरी भाषणातून त्यांच्याकडून घेतले जाणारे चिमटे अनेकदा उपस्थितांना खटकतात. त्यातूनच पुरकेंबाबत मतदारसंघामध्ये एक विरोधाचा प्रवाह निर्माण झाला आहे. संत साहित्याचे दाखले देणारे पुरके अभ्यासू राजकारणी म्हणून जसे परिचित आहेत तसेच ते फटकळ आणि सामान्यांपासून अंतर राखून राहत असल्याचेही सांगितले जाते. त्या तुलनेत वागणुकीत भाजपचे अशोक उईके मतदारांच्या नजरेत सरस ठरतात. आमदार, मंत्री असूनही त्यांनी आपला साधेपणा सोडलेला नाही. टू-बीएचके मधील त्यांचा संसार अनेकांनी पाहिला आहे. घरातील आणि कुटुंबातील साधेपणाचीही मतदारांमध्ये चर्चा होते.उईके यांना पर्याय देण्याचाही जिल्हा भाजपातील दुसºया शक्ती केंद्राने प्रयत्न केला. त्याला सहकार क्षेत्रातूनही ‘बुस्ट’ देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्या सर्वांवर कॅबिनेट मंत्रीमंडळातील वर्णीने मात केली. कालपर्यंत उईकेंच्या विरोधात असलेले घटक आज त्यांच्या सोबत असल्याचे सकारात्मक चित्र भाजपात पहायला मिळते आहे. आतापर्यंत अलिप्त असलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीही बुधवारी उईकेंच्या प्रचारार्थ मतदारांना दर्शन दिले. जिल्ह्यात भाजपची हमखास निवडून येणारी जागा असे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांकडून केले जात असले तरी ही लढत पाहिजे तेवढी उईकेंना सोपी राहिलेली नाही. कारण गेल्या निवडणुकीत मतदारसंघात सामाजिक वजन असलेले अॅड. प्रफुल्ल मानकर, प्रवीण देशमुख आदी घटक आता उघडपणे उईकेंसोबत राहिलेले नाही. उलट त्यांनी एकजुटीने काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न चालविल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत पुरकेंना उमेदवारी नको म्हणून विरोध करणारे हे प्रभावी घटक पक्षहित डोळ्यापुढे ठेऊन एकवटल्याचे दिसते. त्यांच्या एकजुटीमुळे मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळेच राळेगाव मतदारसंघाची लढत ही काँग्रेस व भाजप अशी थेट होणार असल्याचे मानले जाते. प्रहारचे गुलाब पंधरे, वंचित बहुजन आघाडीचे माधव कोहळे हेसुद्धा मतविभाजनाच्या दृष्टीने प्रमुख पक्षांसाठी अडचणीचे उमेदवार ठरणारे आहेत. बाभूळगाव व राळेगावातील भाजपचा नाराज गट खरोखरच पक्षाच्या उमेदवारासाठी काम करतो आहे का याबाबत साशंकतेने पाहिले जात आहे. अशीच साशंकता काही प्रमाणात काँग्रेसच्या वजनदार घटकांबाबतही बोलून दाखविली जात आहे.
Maharashtra Election 2019 ; आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM
राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आहेत. परंतु प्रा. उईके व प्रा. पुरके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. पुरके यापूर्वी शिक्षणमंत्री होते तर उईके आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. मात्र दोघांच्या वागण्यातील विसंगती मतदारांच्या नजरेतून सुटलेली नाही. प्रा. वसंत पुरके यांची भाषणशैली उत्कृष्ट आणि टाळ्या घेणारी असली तरी भाषणातून त्यांच्याकडून घेतले जाणारे चिमटे अनेकदा उपस्थितांना खटकतात.
ठळक मुद्देउईकेंच्या साधेपणाची मतदारांना भुरळ : काँग्रेससाठी सर्व वजनदार गट एकवटले