यवतमाळ : यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या. त्यामुळे भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. यावेळी ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यात सत्तेवर येईल, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी ते यवतमाळात पत्रकारांशी संवाद साधत होते.ते म्हणाले, ईव्हीएम नसते तर लोकसभेत आम्ही 12 जागांवर विजय मिळविला असता. मात्र आता ईव्हीएम हॅकरच आपला व्यवसाय बुडण्याच्या भीतीने ईव्हीएम हॅक करणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाजप देशात चुकीचे चित्र रंगवते, असा आरोप त्यांनी केला. लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुबण्याच्या अवस्थेत आहे. शासनाची तिजोरी रिकामी आहे. व्यापारी, कारखानदार, कामगार सर्वच घटक सरकारमुळे त्रस्त आहे. कापसाचे दर चार हजार क्विंटल दर जात नाही. या सर्वबाबींमुळे जनता त्रस्त झाली असून, या निवडणुकीत आम्हीच खरे विरोधी पक्ष असल्याचे समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देऊन कृषी उद्योग निर्माण करू यामुळे रोजगार वाढेल, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू करू, दुष्काळी भागात शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करू आदी आश्वासने त्यांनी दिली. विधानसभेत भाजप-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतच खरी लढत असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राज्यात वंचितने 272 उमेदवार दिल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही टीकेचे राजकारण सोडून ‘मेन स्ट्रीम डेव्हलपमेंट’बाबत जनतेला समजावून सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला यवतमाळचे उमेदवार योगेश पारवेकर, राळेगावचे उमेदवार माधव कोहळे, अॅड. राजेंद्र महाडोळे, बालमुकुंद भिरड, अॅड. श्याम खंडारे, रमेश गिरोळकर, राजू तलवारे, राजा गणवीर, रणधीर खोब्रागडे आदी उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 : ईव्हीएम हॅक न झाल्यास सत्तेवर येऊ - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:41 PM