लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैश्विक महामारी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांदे निर्माण झाले आहे. काही अर्धपोटी आहे, तर काहींची उपासमार सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने 'मदतीचा एक घास' हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून गरिबांना अन्न पुरवले जाणार आहे.
या उपक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ मंगळवारी झाला. या दिवशी पक्षातील ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी किचनची जबाबदारी सांभाळली. महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, आमदार प्रणितीताई शिंदे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पोळ्या तयार करून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
हा उपक्रम सुरू करताना आमदार प्रणितीताई शिंदे यांनी जनतेलाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण मिळेल आणि जनसेवाही घडून येईल, असे त्या म्हणाल्या. या उपक्रमाच्या निमित्ताने झालेल्या सभेत महिलांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावे, सर्व समित्यांमध्ये महिलांना संधी द्यावी, स्वयंरोजगार मिळावा, महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे आदी मागण्या सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.
गरजूंना डबे पोहोचविणार
'मदतीचा एक घास' या उपक्रमांतर्गत गरजू लोकांपर्यंत जेवणाचे डबे पोहोचविले जाणार आहे. यासाठी महिला काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंपाक करताना १० ते १२ चपात्या अधिक करायच्या आहे. सोबतच स्वयंपाकातील इतर पदार्थ घ्यायचे आहे. हे डबे एका केंद्रावर एकत्र केले जाईल, तेथून गरजू लोकांपर्यंत पोहोचविले जाईल. या उपक्रमात नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.