अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रिअॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली. ‘अभ्यास तर केलाच पाहिजे, पण अभ्यासासोबतच एखादी कलाही जरूर जोपासली पाहिजे’ हे तिचे शब्द बालमैत्रिणींना बरेच काही शिकवून गेले.‘सारेगामापा’ची विजेती अंजली गायकवाड हिने शनिवारी वणीत महिला दिना निमित्त गायन केले. त्यानंतर रविवारी ती यवतमाळात आली. अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. राहुल एकबोटे यांच्या घरी अंजलीच्या भोवती बच्चेकंपनीचा गोतावळा जमला. या बालमित्रांमध्ये अंजली चेंडू घेऊन मनसोक्त खेळली.यावेळी ‘लोकमत’शी तिने मनमुराद गप्पा केल्या. ती म्हणाली, ‘यवतमाळचे लोकं खूप प्रेमळ आहे. या गावातली भाषा मला खूप आवडते. यवतमाळचा चिवडा प्रसिद्ध आहे. मी आस्वाद घेतला त्याचा.’ गाण्यामुळे महाराष्ट्रच काय, देशभरात ओळख मिळालेली अंजली बोलताना तिचा बालसुलभ निरागसपणा कायम होता. ती म्हणाली, मी तीन चार वर्षाची असतानापासूनच गायला लागली. वडील घरी क्लास घ्यायचे ते ऐकून मलाही शिकता आले.’ कुठल्या प्रकारचे गाणे अधिक आवडते, असे विचारल्यावर अंजली म्हणाली, ‘गाणं कुठलंही चांगलंच. पण शास्त्रीय संगीत अधिक जवळचे. ते आपले मूळ आहे. कार्यक्रमात लोक वेगवेगळ्या गाण्याची फर्माईश करतात, म्हणून चित्रपटातील गाणीही गाते. पण पहिली आवड आहे ते शास्त्रीय संगीतच.’ अवघ्या तेरा वर्षाची अंजली आपल्या करिअरविषयी जागरूक आहे. ती म्हणते, ‘प्रसिद्धी जशी चांगली असते, तसे प्रसिद्धीचे तोटेही असतात. प्रसिद्धीमुळे माझ्यात अनाठायी स्वाभिमान येऊ नये, एवढीच प्रार्थना आहे. पण एक खरे, आपण प्रसिद्ध झालो की आपल्याला प्रत्येक वेळी अपडेट राहावेच लागते.’अंजलीचे वडील अंगद गायकवाड अहमदनगरमध्ये गाणे शिकवितात. ते म्हणाले, अंजली लहान असताना मी तिला निजवताना गाणे म्हणायचो. तेव्हा तिच्या डोळ्यात स्मित असे. ते पाहून मला जाणवले, हिच्या मनात गाणे रुजलेले आहे.
महाराष्ट्राची गायिका रमली चिमुकल्यांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 9:51 PM
रिअॅलिटी शो जिंकून अवघ्या रसिकांची मनेही जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका अंजली गायकवाड रविवारी यवतमाळात आली होती. रविवारची सुट्टी अन् त्यात अंजलीचे आगमन म्हणजे, यवतमाळच्या बालगोपाळांसाठी सुवर्णसंधी ठरली. ‘सारेगामापा’च्या मंचावर परिपक्व गाणारी अंजलीही समवयस्कांच्या गर्दीत रममाण झाली.
ठळक मुद्देअंजली गायकवाड : अभ्यास कराच, पण कलाही जोपासा