शेकडो हात गुंतले : ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांचा मोठा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क डोंगरखर्डा : गाव दुष्काळमुक्त करून पाणीदार व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत. ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत आयोजित स्पर्धा कालावधीत गावकऱ्यांनी अथक मेहनत घेवून बक्षिसाचा मानकरी होण्याचा ध्यास घेतला आहे. वॉटर कप स्पर्धेतून श्रमदान करून गाव पाणीदार करा, जलसंधारण व मृदसंधारण करून गाव टंचाईमुक्त करा, असे आवाहन आमदार डॉ. अशोक उईके यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपजिल्हाधिकारी व्यवहारे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदिनी दरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, कृषी अधिकारी आठवले, नायब तहसीलदार विजय होटे, कहारे आदींनी डोंगरखर्डा येथे श्रमदान केले. दहा एकर क्षेत्रात श्रमदान करण्यात आले. या गावात आजपर्यंत अनेक विकास कामे श्रमदानातून पूर्ण करण्यात आली आहे. धरणातील गाळ काढणे, माती बांध, दगडी बांध आदी कामांचा यात समावेश आहे. आता गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. श्रमदानानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वॉटर कप स्पर्धा संपली तरी श्रमदान सतत सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या गावातील विहिरींचीही पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सतत दहा दिवसांपासून याठिकाणी श्रमदान करत असल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार रणजित भोसले यांच्याही मुलांनी याठिकाणी श्रमदान केले. प्रास्ताविक प्रणय काळे, संचालन उत्तम पवार यांनी केले. या उपक्रमासाठी उपसरपंच देवानंद वरफडे आदींचे सहकार्य लाभले.
पाणीदार डोंगरखर्डासाठी महाश्रमदान
By admin | Published: May 08, 2017 12:18 AM