यवतमाळ : उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. ११ जानेवारीला घडलेल्या या घटनेनंतर प्रमुख मारेकरी पसार झाला होता. हत्या नेमक्या कुठल्या कारणातून झाली हे अजूनही स्पष्ट नाही. या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली.
ऐफाज शेख अबरार (वय २२, रा. पुसद) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. ऐफाजला मदत करणाऱ्या ढाणकी येथील चौघांना पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच अटक केली होती. डॉक्टरसोबत २०१९ मध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठी हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, हत्याकांडाचे हे कारण अनेकांना अजूनही असंयुक्तिक वाटत आहे. खरा मारेकरी पोलिसांच्या हाती लागल्याने हत्येचे नेमके कारण, त्याने गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, दुचाकी जप्त केल्यानंतरच याचा उलगडा होणार आहे.
अज्ञात मारेकरी असतानाही पाेलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला. डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्याशी निगडित सर्व माहिती पडताळण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत माग काढण्यात आला. त्यावरून शेख ऐफाज शेख अबरार याने ही हत्या केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. सलग २६ दिवसांपासून शेख ऐफाज पोलीस पथकांना गुंगारा देत होता.
पोलिसांनी नांदेड, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, हैदराबाद या सर्वच प्रमुख शहरांमध्ये त्याचा कसून शोध घेतला. मात्र, सुगावा मिळत नव्हता. मध्य प्रदेशातील धार येथे शेख ऐफाज दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी, सहायक निरीक्षक विवेक देशमुख यांच्या पथकाने आरोपीचा माग काढला व त्याला धार येथून अटक केली. पुढील तपास उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार अमोल माळवे करीत आहेत. आरोपीला शनिवारी पुसद न्यायालयात हजर करण्यात आले.
अनेक प्रश्नांचा होणार उलगडा
आरोपी शेख ऐफाज याने डॉक्टरची हत्या नेमकी कुठल्या कारणाने केली हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्याला ही हत्या करण्यासाठी इतर कोणी प्रवृत्त केले का, याचाही शोध पोलीस घेणार आहेत. ऐफाजच्या अटकेनंतर आता उपस्थित होत असलेल्या सर्वच प्रश्नांची उकल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.