लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्लॉटच्या व्यवहारात सदोष सेवा दिल्याप्रकरणी मैत्रेय प्लॉट्स अँड स्ट्रक्चर्स आणि गॉडसन प्लॉट्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. विशेष म्हणजे, या दोनही प्रकरणात तक्रारकर्त्या महिला आहे. झालेल्या नुकसानीपोटी तक्रारकर्त्यांना सव्याज रक्कम द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे.येथील गाडगेनगरातील संगीता अजय दर्डा यांनी मैत्रेय प्लॉट्स अँड स्ट्रक्चर्स प्रा.लि.मध्ये एका योजनेनुसार रकमेची गुंतवणूक केली. प्लॉट किंवा काही रक्कम मिळणार असल्याने त्यांनी ठरल्याप्रमाणे रकमेचा भरणा केला. मुदतीच्या अखेरच्या टप्प्यात रकमेचा भरणा करण्यासाठी गेल्या असता मैत्रेयचे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. १२१० चौरस फुटाचा प्लॉट किंवा एक लाख तीन हजार ६०० रुपये एवढी रक्कम त्यांना गुंतवणुकीपोटी मिळणार होती. मात्र कार्यालयच बंद असल्याने त्यांना यापासून मुकावे लागले.वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार केली. मंचचे प्रीसाईडिंग सदस्य सुहास आळशी आणि सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तिवाद झाला. मैत्रेयने संगीता दर्डा यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. मैत्रेय कंपनीने संगीता दर्डा यांना प्लॉट द्यावा किंवा गुंतविलेले ५७ हजार रुपये सव्याज द्यावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी आणि तक्रार खर्चाचे १८ हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश मंचाने दिला आहे. या प्रकरणात संगीता दर्डा यांची बाजू अॅड. राजेश जैन यांनी मांडली.गॉडसनला दंडदुसऱ्या एका प्रकरणात येथील गॉडसन प्लॉट्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीला मंचाने दंड ठोकला आहे. येथील लोहारा परिसराच्या चिंतामणीनगरातील सुनीता कुंभारे यांनी गॉडसन प्लॉट्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीच्या योजनेनुसार प्लॉटसाठी किस्तीने रकमेचा भरणा केला. मुदत संपल्यानंतर प्लॉट नावे करून घेण्यासाठी त्यांनी कंपनीकडे मागणी केली. मात्र टाळाटाळ करण्यात आली. सूर्यनगर लोहारा येथील ११३० चौरस फुटाच्या प्लॉटकरिता त्यांनी रकमेचा भरणा केला होता. १९९५ मध्ये झालेल्या इसारचिठ्ठीनुसार त्यांना प्लॉटची खरेदी करून देण्यात आली नाही. अखेर त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात कंपनीने सुनीता कुंभारे यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने त्यांना प्लॉटची खरेदी करून द्यावी किंवा शासकीय दरानुसार सव्याज रक्कम द्यावी, असा आदेश दिला आहे. पिठासीन सदस्य सुहास आळशी, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत सदर प्रकरण चालले.प्लॉट दुसऱ्याला विकलासुनीता कुंभारे यांनी बुकिंग केलेला प्लॉट दुसऱ्याला विकल्याची बाब तक्रारीवरील युक्तिवादादरम्यान स्पष्ट झाली. भूखंड एनए झाल्याशिवाय प्लॉटची बुकिंग बेकायदेशीर आहे. प्लॉट खरेदीच्यादृष्टीने आवश्यक ती माहितीही पुरविली नाही, असे मंचने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
मैत्रेय, गॉडसन कंपनीला ग्राहक मंचची चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:49 PM
प्लॉटच्या व्यवहारात सदोष सेवा दिल्याप्रकरणी मैत्रेय प्लॉट्स अँड स्ट्रक्चर्स आणि गॉडसन प्लॉट्स अँड कंस्ट्रक्शन कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. विशेष म्हणजे, या दोनही प्रकरणात तक्रारकर्त्या महिला आहे. झालेल्या नुकसानीपोटी तक्रारकर्त्यांना सव्याज रक्कम द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे.
ठळक मुद्देनुकसान भरपाई देण्याचा आदेश : तक्रारकर्त्या महिलांना न्याय