संदीप मांडके : कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्पपुसद : देह क्षणभंगूर आहे. मनुष्य मरते आहे. त्यामुळे निसर्गाने पदरात टाकलेले आयुष्याचे दान सार्थकी लावा. आपला देह चंदनासारखा झिजवा, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार संदीप मांडके यांनी येथे केले.देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. संदीप मांडके म्हणाले, देव, देश आणि धर्म यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या कार्यात जीवाला जीव देणाऱ्या स्वामिनिष्ठ सहकाऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या हौतात्म्यामुळेच ते अमर झाले. शिवपर्वातील हा तेजस्वी इतिहास अत्यंत प्रेरणदायी आहे, असे ते म्हणाले. देह त्यागिला कीर्ती मागे उरावी हा समर्थ रामदासांचा श्लोक त्यांनी विवेचनासाठी घेतला. छत्रपती शिवरायांचे निष्ठावान सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांचे आख्यान लावले. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी पोवाडे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कीर्तनकारांचा सत्कार रवी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्वप्नील चिंतामणी यांनी कीर्तनकारांचे स्वागत केले. कार्यक्रमाला माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, कृषी भूषण दीपक आसेगावकर, माजी पोलीस उपअधीक्षक दयाराम चव्हाण, माजी सरपंच राजेश आसेगावकर, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव, नंदेश चव्हाण, स्रेहलता चिंतामणी, स्मिता वाळले उपस्थित होते. यावेळी तबल्यावर साथ करणारे न्यायाधीश शरद देशपांडे यांचे स्वागत अॅड.विनोद चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)
निसर्गाने पदरात टाकलेले आयुष्य सार्थकी लावा
By admin | Published: April 08, 2016 2:25 AM