तालुक्यात ९ आणि १० जूनला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पार्डी (निंबी), वालतूर (रेल्वे), भोजला, शेलू, रंभा, पिंपळगाव (मुं), वनवार्ला, कवडीपूर, धनकेश्वर परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
ढगफुटीसारख्या पावसाने जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नाल्याला आलेल्या पुराने खरडून गेल्या. पिंपळगाव, रंभा या गावातील शेतकऱ्यांचे ऊस, केळी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तत्काळ नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे. तसेच जादा दराने बियाणे, खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तालुका रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनावर बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, प्रा. अंबादास वानखेडे, समाधान केवटे, कैलास श्रावणे, प्रेम ठोके, प्रकाश धुळे, अमर पाटील, भीमराव कांबळे, जयराम माथने, दिलीप धुळे, शंकर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.