यवतमाळ : दारूच्या नशेत हिस्सेवाटणीसाठी वाद करायला आलेल्या मोठ्या भावाने आईवरच हात उगारला, आई जमिनीवर कोसळली हे दृश्य पाहून लहान भावाचा संताप अनावर झाला. त्याने घरातील धारदार चाकूने मोठ्या भावावर सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता माळीपुरा परिसरात घडली. भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
येथील टांगा चौकात राहुल मनोहर बाचलकर (३६) आणि सतीश मनोहर बाचलकर (३२) या दोन भावांची वेगवेगळी फुलांची दुकाने आहेत. काही दिवसांपासून मोठा भाऊ राहुल हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने शेतीच्या वाटणीसाठी तगादा लावला. सोमवारी दोन्ही भावांच्या शेतीची नातेवाईकांनी मादणी शिवारात जाऊन वाटणी करून दिली. शेतातच मोठा भाऊ राहुल याने शिवीगाळ करून सतीशवर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी दोघांची समजूत काढून त्यांना घरी आणले.
वाद मिटला असे समजून नातेवाईक निघून गेले. दुसऱ्या दिवशी राहुल धारदार शस्त्र घेऊन आई राहत असलेल्या घरापुढे पोहोचला. त्याला परिसरातील महिलांनी आवरून त्याच्या जवळचे शस्त्र काढून घेतले. नंतर पुन्हा तो घरी जाऊन परत आईच्या घरासमोर येऊन वाद घालू लागला. तो प्रसंग पाहून आईने लहान मुलाला घराबाहेर पडू नको असे सांगितले. आई दारात उभी राहून मोठा मुलगा राहुल याची समजूत काढत होती. यातच राहुलने आईवर हात उगारला. ती कोसळली. हे पाहून घरात असलेल्या सतीशचा संताप अनावर झाला. त्याने हाती लागलेला चाकू घेऊन राहुलच्या अंगावर चाल केली. चाकूचे वर्मी घाव बसल्याने राहुल जागेवरच कोसळला.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
मोठ्या भावाचा चाकून भोसकून खून केल्यानंतर काही मिनिटातच लहान भाऊ सतीश भानावर आला. आपल्या हातून मोठी अघटित घटना घडल्याचे पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला. पोलीस येईपर्यंत सतीश घरीच बसून होता. त्याला शहर पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.