बालाप्रसाद सोडगिर ।लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा : पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे. मोटरपंप जळाल्याचे कारण सांगितले जात असले तरी वर्षभरही ही योजना रखडतच सुरू असते. परिणामी सणासुदीच्या काळात महिलांसह पुरुषांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पुसद तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कित्येक वर्षांपासून कुप्रसिद्ध आहे. या भागातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी ४० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून योजना सुरू झाली. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोपजवळ जॉकवेल आहे. तर फेट्रा गावात जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण केंद्र आहे. या ठिकाणाहून माळपठारातील ४० गावांना पाणीपुरवठा होतो. यासाठी गावागावांत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहे. परंतु गत पाच-सहा वर्षांपासून ही योजना अखेरच्या घटका मोजत आहे. अधिकाºयांना विचारले तर वसुलीचे कारण पुढे करतात. गावकºयांना विचारले तर वेळेवर पाणीच मिळत नाही, पाणपट्टी द्यायची कशी, असा प्रश्न उपस्थित करतात. वसुली होत नसल्याने दुरुस्ती होत नाही. परिणामी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.अलिकडे योजनेचे पाणी आठ दिवसाआड दिले जात होते. कागदोपत्री रोजच पाणीपुरवठा होत असल्याचे दाखविले जाते. १५ दिवसांपासून पाण्याचा एक थंबही माळपठारात आला नाही. त्यामुळे मारवाडी, रोहडा, बेलोरा, केदारलिंग, बेलोरा बु., वाडी, वागजाळी, मांजरजवळा, म्हैसमाळ, पन्हाळा या गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. दिवाळीसारख्या सणातही नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळाले नाही. गावालगतच्या विहिरी आणि बोअरवेलवरून पाणी आणावे लागते. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने योजनेच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली, त्यावेळी मोटरपंप जळाल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. सध्या नागरिक आॅटोरिक्षा, सायकल, बैलगाडीने दोन-दोन किलोमीटरहून पाणी आणताना दिसत आहे.वसुलीच्या काळात मुबलक पाणीपाणीपट्टीच्या वसुलीकाळात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मुबलक पाणी गावकºयांना दिले जाते. वसुलीसाठी जाताना नागरिकांनी संतप्त होवू नये म्हणून हा फंडा वापरला जातो. इतर काळात मात्र पाण्याचा थेंबही येत नाही. ऐन उन्हाळ्यातही पाणी मुबलक सोडले जाते. वसुलीकाळात पाणी कोठून येते, असा प्रश्न नागरिकांना कायम सतावत आहे.विकतचे पाणीपाणीपुरवठा बंद असल्याने या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. अनेक वाहनचालकांनी पाणी विकण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. मालवाहू वाहनात टाक्या ठेवून गावोगाव ही मंडळी पाणी विकत आहे. याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी तर मजुरी बुडते आणि विकत पाणी घ्यावे तर पैसे नाही, अशा अवस्थेत ही मंडळी राहात आहे. पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.
माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:18 PM
पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे.
ठळक मुद्देमोटरपंप नादुरस्त : ४० गावांतील नागरिकांचे हाल, कृत्रिम पाणीटंचाई